पीएमपीची ढकलगाडी सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 08:05 PM2018-07-31T20:05:12+5:302018-07-31T20:14:10+5:30
पीएमपी बसेस मार्गावर बंद पडण्याचे सत्र अजूनही सुरुच अाहे. या बसेस बंद पडण्याला अाता प्रवासी कंटाळले असून यात सुधारणा हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
पुणे : पुण्याची एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीची ढगलगाडी अजूनही सुरुच अाहे. सातत्याने पीएमपीच्या बसेस मार्गावर बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत अाहे. मंगळवारी विश्रांतवाडी- संगमवाडी बीअारटी मार्गात दाेन बसेस एकामागाेमाग एक बंद पडल्या हाेत्या. त्याचबराेबर शिवाजीनगर येथेही एक बस बंद पडली हाेती. प्रवाशांना धाेकादायकरीत्याच बीअारटी मार्गात उभे करण्यात अाले हाेते. त्यामुळे पीएमपीचे प्रशासन बसेसच्या देखभालीकडे लक्ष देणार का असा प्रश्न पुणेकर अाता विचारतायेत.
गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या बसेस मार्गात बंद पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले अाहे. सातत्याने या बसेस मार्गात बंद पडत असल्याने वाहतूकीसही अडथळा हाेत अाहे. याबाबत पुणे वाहतूक पाेलिसांना पीएमपीला पत्र लिहून बस मार्गात बंद पडणार नाहीत याची खबरदारी घेण्यास सांगितले हाेते. तरीही पीएमपी प्रशासनाला जाग अाली नसल्याचे चित्र असून मार्गात बसेस बंद पडण्याचे सत्र अजूनही सुरुच अाहे. पुण्याची प्रवासी संख्या अाणि पीएमपीच्या बसेस यांचे प्रमाण अाधीच व्यस्त अाहे. त्यातच या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत अाहे. अनेक बसेस या जुन्या झाल्या असल्याने त्या मार्गावर केव्हा बंद पडतील हे सांगता येत नाही. त्याचबराेबर अनेक बसेसमधून माेठ्याप्रमाणावर धूर साेडण्यात येत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागताे. त्याचबराेबर यामुळे प्रदुषणातही माेठी वाढ हाेत अाहे. अनेक पीएमपी बसेसच्या खिडक्या, सीट्स सुद्धा तुटले अाहेत. अनेक बसेसच्या मागच्या काचा फुटल्या असल्याने त्या ठिकाणी थेट पत्रा ठाेकण्यात अाला अाहे.
बीअारटी मार्गाची स्थितीही बिकट अाहे. बीअारटी बसस्टाॅप्सचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याने बस अाल्यानंतर धक्का लागून एखादा अपघात घडण्याची शक्यता अाहे. या बसस्टाॅपचा स्वच्छतेचा प्रश्नही एैरणीवर अाला अाहे. एककीकडे पुणे शहर स्मार्ट हाेत असले तरी येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मागास हाेत चालली असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे यात येत्या काळात सुधारणा हाेणार का याकडे पुणेकरांचे लक्ष लागले अाहे.