ब्रेकडाऊन पीएमपीने शिवाजीनगर थबकले
By Admin | Published: April 17, 2016 03:03 AM2016-04-17T03:03:32+5:302016-04-17T03:03:32+5:30
ऐन वर्दळीच्या काळात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाच्या परिसरात तीन बसचे ब्रेकडाऊन झाल्याने, शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड
पुणे : ऐन वर्दळीच्या काळात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या उड्डाणपुलाच्या परिसरात तीन बसचे ब्रेकडाऊन झाल्याने, शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शनिवारी काम संपवून रविवारच्या सुटीच्या आनंदात असलेल्या चाकरमान्यांना तब्बल दीड ते दोन तास ताटकळत राहावे लागले. सायंकाळी सहा वाजता ब्रेकडाऊन झालेल्या दोन बसेस सातच्या सुमारास रस्त्यावरून बाहेर काढण्यात आल्यानंतर आणखी एक बस बंद पडल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
सायंकाळी सहाच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात पीएमपीच्या दोन बस बंद पडल्या. त्यामुळे आधीच संथ झालेली वाहतूक जागेवर थांबल्याने त्याचा परिणाम काही वेळात गणेशखिंड रस्त्यावर झाला.
त्यानंतर हळूहळू या परिसरातील सर्वच रस्ते वाहतुकीने गजबजून गेले. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, या बसच्या ब्रेकडाऊनमुळे वाहनांची रांग शिवाजीनगरपासून थेट
पुणे विद्यापीठापर्यंत होती. ही
कोंडी फोडण्यासाठी जादा वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.
(प्रतिनिधी)
बस दूर करण्यास लागला दीड तास
रस्त्यावर झालेल्या वाहतूककोंडीमुळे या बस बाजूला करण्यास तब्बल एक ते दीड तासाचा कालावधी गेला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा अवघ्या काही वेळात कृषी महाविद्यालय चौकातील उड्डाणपुलावर आणखी एक बस बंद पडल्याने कोंडीत आणखीन भर पडली. त्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास आणखी विलंब लागल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या ब्रेकडाऊनमुळे फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीरस्ता, आरटीओ; तसेच पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.