पीएमपीच्या तिकीट मशीनचेही ब्रेकडाऊन : प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:41 PM2019-08-23T13:41:12+5:302019-08-23T13:50:14+5:30

विविध कारणांमुळे या मशिन मार्गातच बंद पडत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

Breakdown of PMP ticket machine :headches for passenger | पीएमपीच्या तिकीट मशीनचेही ब्रेकडाऊन : प्रवाशांना मनस्ताप

पीएमपीच्या तिकीट मशीनचेही ब्रेकडाऊन : प्रवाशांना मनस्ताप

googlenewsNext
ठळक मुद्दे मशिनच्या देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे मशीन बंद पडल्यावर वाहकांनी पूर्वीच्या ट्रे पद्धतीचा आधार हाताशी ठेवणे आवश्यक

- तेजस टवलारकर- 
पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील बस रस्त्यातच बंद पडल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामध्ये आता ई-तिकिटिंग मशीनच्या ब्रेकडाऊनची भर पडली आहे. विविध कारणांमुळे  या मशिन मार्गातच बंद पडत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच त्यामुळे  पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे समोर आले आहे. 
देशात पहिल्यांदा पीएमपीने बसमध्ये ई-तिकिटिंगला सुरूवात केली. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, वाहकांवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने ई-टिकिटिंगला पसंती देण्यात आली. पीएमपी प्रशासनाला त्याचा फायदाही झाला. पण या मशिन तांत्रिक बिघाडामुळे पीएमपीला फटकाही बसत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री मनपा ते माळवाडी मार्गावरील बसमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आला. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्रवासी तिकीट काढण्यासाठी वाहकाला पैसे देत असतानाच तिकिट मशीन बंद पडली.  प्रवासी वाहकाकडे तिकिटाची मागणी करत होते. वाहक देखील तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मशीनमधून तिकीट येत नव्हते. मशीन बिघडल्याने बस थांब्यावर थांबल्यानंतर नवीन प्रवाशांनी चढू नये, असे वाहक सांगत होता. त्यानंतर बस कोथरूड येथील गांधी भवन थांब्यावर थांबवण्यात आली. तेथे दुसरी मशीन मागवण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना तिकिटे देण्यात आली. पण त्यापूर्वी तिकीट न घेताच काही प्रवासी बसमधून उतरले.
असाच अनुभव प्रवाशांना अनेकदा येत आहे. मशीन अचानक बंद पडणे, वारंवार चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे, तिकीट निघण्यास उशीर होणे, अशा प्रकारांत वाढ झाली आहे. यातून पीएमपीला आर्थिक नुकसानदेखील होत आहे. ई-तिकीट मशीनच्या या अडचणींमुळे अनेक वाहक त्रस्त  झाले आहेत.  प्रवासी आणि वाहक यांच्यात अनेकदा वाद होण्याच्या घटना घडतात. चार्जिंग उतरल्यावर गाडीमध्ये कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहकांना  स्वत:ची पावरबँकसोबत ठेवावी लागत आहे. मशीन बंद पडल्यावर वाहकांनी पूर्वीच्या ट्रे पद्धतीचा आधार हाताशी ठेवणे आवश्यक आहे. वाहकांना नव्या मशीन उपलब्ध करणे किंवा त्यांना ट्रे सोबत ठेवण्याची सक्ती करण्याबाबत पीएमपी प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
.....
ई-तिकीट मशीनच्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढत आहे. पण या मशिनच्या देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांना वारंवार सूचनाही दिल्या आहेत. त्यांना दंडही करण्यात आला आहे. पण त्यानंतरही मशिन बंद पडत असल्याचे तक्रारी येत आहेत.- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
.....
बसमध्ये रोज प्रचंड गर्दी असते. गर्दी असल्यावर तिकीट काढण्यासाठी मशीनवर ताण येतो. त्यामुळे मशीन अचानक बंद पडते. कधी तिकीट येण्यास उशीर होतो. त्यामुळे काही प्रवाशी चिडचिड करतात. स्वत:ची पॉवरबँकजवळ ठेवावी लागते. चेकर गाडी तपासण्यासाठी आले तर हिशोब देण्यात अडचणी येतात.- पीएमपी वाहक

Web Title: Breakdown of PMP ticket machine :headches for passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.