ब्रेकडाऊन पीएमपीला ‘ब्रेक’ लावण्याचे आदेश
By admin | Published: April 2, 2017 02:47 AM2017-04-02T02:47:10+5:302017-04-02T02:47:10+5:30
देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे
पुणे : देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्याचे ब्रेकडाऊनचे प्रमाण २० ते ३० टक्के असून, ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असा आदेश त्यांनी सर्व आगारप्रमुखांना दिला आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच महत्त्वाचे निर्णय घेऊन पीएमपीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कामाची वेळ बदलण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा दिवस विनावेतन करण्यात आला. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठीही आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या २७५ ते ३०० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पीएमपीला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. पीएमपीची प्रतिमाही खराब झाली आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्त्वावरील एकूण २०३६ बसेस असून, त्यातील सुमारे १३०० ते १४०० बसेस दररोज मार्गावर असतात. मात्र त्यातील सरासरी २७५ ते ३०० बसेस रोज अनेक कारणांमुळे ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक बस सातत्याने बंद पडतात. (प्रतिनिधी)