देखभाल-दुरुस्तीअभावी ब्रेकडाऊन टॉप गिअरवर

By admin | Published: April 23, 2015 06:37 AM2015-04-23T06:37:41+5:302015-04-23T06:37:41+5:30

कार्यशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे ब्रेकडाऊनचे (तांत्रिक बिघाड) प्रमाण बृहन्मुंब

Breakdown top gear due to lack of maintenance | देखभाल-दुरुस्तीअभावी ब्रेकडाऊन टॉप गिअरवर

देखभाल-दुरुस्तीअभावी ब्रेकडाऊन टॉप गिअरवर

Next

पुणे : कार्यशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे ब्रेकडाऊनचे (तांत्रिक बिघाड) प्रमाण बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) बसच्या तुलनेत टॉप गिअरवर आहे. बेस्ट व बीएमटीसीपेक्षा पीएमपीच्या बसचे प्रमाण अनुक्रमे दुप्पट व तिपटीने कमी असूनही तांत्रिक बिघाडामध्ये मात्र ‘पीएमपी’ आघाडीवर आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बससह सध्या सुमारे २,२०० गाड्या आहेत. यांपैकी सध्या दररोज सुमारे ७२ टक्के बसच मार्गावर असतात. मार्गावर असलेल्या बसपैकी दररोज सुमारे दीडशे ते दोनशे बस तांत्रिक बिघाडामुळे मार्गावरच बंद पडतात. बे्रकडाऊनमुळे अनेकदा फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पीएमपीवर ओढवते. त्याचा परिणाम उत्पन्नावर तसेच प्रवाशांवरही होत आहे. बेस्ट व बीएमटीसीच्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण मात्र खूपच अत्यल्प आहे. बेस्टकडे असलेल्या सुमारे ४,२०० तर बीएमटीसीकडे असलेल्या सुमारे ६,५०० बसपैकी एकही बस भाडेतत्त्वावरील बस नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व बसवर पूर्णपणे नियंत्रण असते. पीएमपीकडे खासगी ठेकेदारांकडे सुमारे १ हजार बस आहेत. या बसवर पीएमपीचे पूर्ण नियंत्रण नसते; त्यामुळे ब्रेकडाऊनचा आकडा वाढत जातो.
दर हजार किलोमीटरमागे पीएमपीच्या सरासरी १.५ बस मार्गावर बंद पडतात. याचा विचार केला असता, बेस्टचे हे प्रमाण ०.५, तर बीएमटीसीचे प्रमाण केवळ ०.१ बस एवढे आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ, प्रशस्त व अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज कार्यशाळांमुळे बेस्ट व बीएमटीसीचे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे ‘पीएमपी’कडे पुरेशा कुशल मनुष्यबळाबरोबर कार्यशाळाही सुसज्ज नाहीत. पीएमपीला ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी देखभाल-दुरुस्तीचा वेग वाढवावा लागणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Breakdown top gear due to lack of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.