विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारातील नाश्ता, जेवणाचे दर घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:14 PM2019-10-02T12:14:58+5:302019-10-02T12:28:44+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खाद्यपदार्थ झाले स्वस्त
प्रकाश गायकर-
पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी खर्च करावयाच्या दहा मुख्य बाबींसाठीच्या खर्चाचे दरपत्रक संनियंत्रण समितीने जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत जेवणासह नाश्त्याचे दर कमी केल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी विविध बाबींवर खर्च करावा लागतो. त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या जेवाणावळीवर उमेदवाराला लाखो रुपये खर्च करावे लागतात. या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दरदिवशी सादर करावा लागतो. शहरातील विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करण्यासाठी उमेदवाराला अनेक प्रयत्न करावे लागतात. विविध ठिकाणी जाण्यासाठी वाहने, पेट्रोल यांचाही खर्च करावा लागतो. त्यासोबतच कार्यकर्त्यांच्या चहापाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. निवडणूक कालावधीत यासोबतच मद्यावरही भरमसाठ खर्च करावा लागतो. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत कडक नियम केले आहेत. शिवाय दरपत्रकही निश्चित करण्यात
आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने खर्च सनियंत्रण समिती नेमली आहे. या समितीने मुख्य दहा बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, शाकाहारी प्रकारात पुलाव ५० रुपये, व्हेज थाळी ६० रुपये, स्पेशल थाळी १२० रुपये असे दर निश्चित केले आहेत. यासोबतच मांसाहारी प्रकारात अंडाकरी ९०, मच्छी १५०, मटण २०० आणि चिकन थाळी १२० रुपये. साधा चहा ६ रुपये, स्पेशल चहा १२ रुपये, वडापाव १० रुपये, पोहे १५ रुपये, पॅटीस १० रुपये अशा पद्धतीने खर्च करता येणार आहे. याबरोबरच पाण्याची बाटली छोटी, मोठी आणि जार यासाठी प्रत्येकी १०, १५ आणि १०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सर्व दर लोकसभा निवडणुकीतील दरपत्रकापेक्षा कमी आहेत.
.......
निवडणूक आयोगाचे मेनूकार्ड (रुपये)
मेनू विधानसभा लोकसभा
दर दर
वडापाव १० १५
पॅटीस १० १५
व्हेज थाळी ६० १००
स्पेशल थाळी १२० १५०
नाश्ता ५ अन् जेवण ३० रुपयांनी स्वस्त
४लोकसभा निवडणुकीवेळी वडापाव आणि पॅटीसचे दर १५ रुपये होते. पोहे, उपमा ३० रुपये, साधा चहा ८ व स्पेशल चहा १५ रुपये असे दर होते. तर जेवणामध्ये शाकाहारी थाळी १०० रुपये, स्पेशल थाळी १५० रुपये, अंडाकरी ९० रुपये, मटण, चिकन व मच्छी थाळी प्रत्येकी २५० रुपये याप्रमाणे होती. या दरांची तुलना करता नाश्ता ५ रुपये व जेवण ३० ते ६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यासोबतच प्रचार साहित्य, मंडप स्टेज, विद्युत उपकरणे यांचेही दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी स्वस्ताई झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत