Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:07 PM2022-05-13T18:07:32+5:302022-05-13T19:52:57+5:30
किडनी तस्करी प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे : रूबी हॉल रूग्णालयामधील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दोन मुख्य एजंटांना भोसरी येथून कोरेगाव पार्क पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. एका एजंटच्या नाव व पत्यावरून दुस-या एजंटाचा शोध घेण्यात आला आणि तोही पोलिसांना सापडला. या प्रकरणातील हे दोन महत्वाचे आरोपी आहेत. त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याने त्यांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिली.
अभिजीत शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत विटभट्टी, एरंडवणे गावठाण), रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या एजंटांची नावे आहेत. याबाबत, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम (वय 59, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.आॅगस्ट 2021 ते मार्च 2022 दरम्यान ग्रँट मेडीकल फाऊंडेशन रुबीहॉल हॉस्पीटल मध्ये घडला. किडनी प्रत्यारोपणासाठी अमित व सुजाता साळुंखे दाम्पत्याने एजंट रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे यांच्या मदतीने कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून रूबी हॉल येथे सादर केली. तर, अन्य आरोपींनी कागदपत्रांची खात्री न करताही कागदपत्रे रिजनल आॅथोरायजेशन कमिटीकडे (ससून) पाठवून दिशाभूल केली. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचे
उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी अटक आरोपींसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी गटणे व रोडगे याला अटक करत न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड युक्तिवादादरम्यान म्हणाले, आरोपींनी अमित साळुंखे व किडनी देणा-या महिलेस कोणाच्या मदतीने संपर्क साधला. महिलेला किडनी देण्यासाठी किती पैसे देण्याचे कबूल केले होते तसेच तिला किती पैसे दिले. गुन्ह्यातील बनावट दस्ताऐवज आरोपींनी कोठे तयार केले यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अँड. गायकवाड यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
किडनी दान करणारी झाली बायको
बेकायदा किडनी प्रत्योरापण प्रकरणात किडनी दान करणारी महिला व किडनीची आवश्यकता असलेला पुरूष हे पती-पत्नी असल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी लग्नाचे बनावट छायाचित्र, आधार व मतदार ओळखपत्र तयार केल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी एस पाटील यांच्या न्यायालयाला दिली.