सेकंड इनिंगमध्येही होतोय ब्रेकअप, साठीनंतरच्या घटस्फोटांचे दावे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:14 AM2018-12-23T02:14:10+5:302018-12-23T02:15:42+5:30

लग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतात. अशा वेळी घरातील वरिष्ठ मंडळी त्यांचा संसार रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात.

Breaking up even in second inning, divorce claims for later increases | सेकंड इनिंगमध्येही होतोय ब्रेकअप, साठीनंतरच्या घटस्फोटांचे दावे वाढले

सेकंड इनिंगमध्येही होतोय ब्रेकअप, साठीनंतरच्या घटस्फोटांचे दावे वाढले

Next
ठळक मुद्देलग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतातनोकरी-धंद्यानिमित्त दूर असल्याने थांबलेला संवाद, लवकर लग्न झाल्याने संसारातून उडालेले मन आणि एकमेकांच्या चारित्र्याविषयी वाढलेला संशय अशा कारणांमुळे साठीनंतर घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेतवादाची तीव्रता वाढतच गेल्याने मुले देखील आई-वडिलांच्या भांडणात लक्ष द्यायचे कमी करतात. त्यातून दोघांची घुसमट वाढल्याने व अनेक वर्षांचा संसार झाल्यानंतरही उर्र्वरीत आयुष्य सुखी होण्यासाठी वृद्धही घटस्फोटाचा मार्ग निवडत आहेत

- सनील गाडेकर
पुणे : लग्नानंतर काही वर्षांतच दाम्पत्यामध्ये वाद निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतात. अशा वेळी घरातील वरिष्ठ मंडळी त्यांचा संसार रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, असे प्रयत्न करणारी ज्येष्ठ मंडळीच आता विभक्त
होत आहेत. वयाच्या अंतरामुळे विचारात पडलेला फरक, नोकरी-धंद्यानिमित्त दूर असल्याने थांबलेला संवाद, लवकर लग्न झाल्याने संसारातून उडालेले मन आणि एकमेकांच्या चारित्र्याविषयी वाढलेला संशय अशा कारणांमुळे साठीनंतर घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत.

वयाच्या पन्नाशीनंतर जीवनातील अनेक इच्छा पूर्ण झालेल्या असतात. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मानसिक सोबतीची गरज असते. आला दिवस चांगला जगण्यासाठी त्यांच्यासोबत असलेला मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मात्र तो आधारच आता हरवत चालला आहे.
ही साथ प्रत्येकाला मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्था वाढत आहे. मुले मोठी झाली की वृद्ध दाम्पत्यात एकटेपणा येतो. त्यामुळे आता संसारात काही सुख राहिले नाही, असे विचार वाढीस लागतात. कोणत्याही विषयावर एकमत होत नसल्याने त्यांच्यात शुल्लक बाबींवरून द्वेष वाढत जातो. मुलांबरोबर देखील भांडणे होतात.

वादाची तीव्रता वाढतच गेल्याने मुले देखील आई-वडिलांच्या भांडणात लक्ष द्यायचे कमी करतात. त्यातून दोघांची घुसमट वाढल्याने व अनेक वर्षांचा संसार झाल्यानंतरही उर्र्वरीत आयुष्य सुखी होण्यासाठी वृद्धही घटस्फोटाचा मार्ग निवडत आहेत. आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर मुलांचे म्हणणे असते की, या वयात घटस्फोट घेऊन करणार काय? त्यावर त्याचे उत्तर असते की, नातेच शिल्लक राहिले नसेल तर एकत्र राहून काय होणार. समाजाला दाखवण्यासाठी नोकरी, लग्न, मुले, संसार झाला. पण पती-पत्नी म्हणून त्यांनी जे जीवन जगायला पाहिजे होते ते जीवन त्यांना प्रत्यक्षात मिळालेलेच नसते.

चारित्र्याचा संशय ठरला दुराव्याचे कारण

७९ वयाचे भानुदास व त्यांच्या पत्नीचे वय सध्या ७५ आहे. सिंहगड रस्ता परिसरात इंग्लिश माध्यमाच्या तीन शाळा असल्याने पैशाची कधीच कमतरता नाही. मात्र, त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू झाले.
पत्नीला कॅन्सर असताना भानुदास यांनी तिला मोलाची साथ दिली. पण तुमचे मोलकरणीशी अनैतिक संबंध आहेत तर पत्नीचे देखील बाहेर प्रकरण सुरू असल्याचा कारणांवरून वाद विकोपाला गेले.
पतीला घरातून बाहेर काढण्यासाठी व शाळेतील संचालक पदाचा राजीनामा देण्यासाठी गुंड पाठवण्यापर्यंत पत्नीची मजल गेली. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झालेले आहे, असे असतानाही भानुदास यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

स्वाभिमान व माहेरचे सुख सोडवले नाही

नोकरीनिमित्त शांताराम पुण्यात स्थायिक झाले. प्रचंड श्रीमंती असलेल्या राधाबाई यांच्याबरोबर त्यांचे १९७४ साली लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांनी पत्नीला पुण्यात आणले. पण त्यांचे पुण्यात मन रमले नाही. बाळंतपणाच्या नावाखाली त्या चार-चार वर्षे माहेरीच थांबत. माहेरच्या श्रीमंतीमुळे त्यांना पतीची नोकरी कधीच पटली नाही. मात्र, पतीला स्वाभिमान व पत्नीला माहेरचे सुख सोडवलेच नाही. त्यामुळे त्यांच्यातील विभक्तपणा वाढत गेला. मुलांना आईच जवळची वाटू लागली. आज ते विभक्त होण्याच्या वाटेवर असून त्यांचा दावा न्यायालयात सुरू आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून त्यांचेही लग्न झालेले आहे.

पुरेसा संवादच झाला नाही

सैन्यात नोकरीला असल्यामुळे तुकाराम यांना कुटुंबाला जास्त वेळ देता आला नाही. त्यामुळे आशा यांना पतीविषयी आकर्षणदेखील राहिले नव्हते. मी देशाची सेवा करतो याचे घरच्यांना काहीच सोयरसुतक नाही, अशी भावना तुकाराम यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच त्यांच्यात दुरावा वाढत गेला. एक मुलगा आणि तीन मुली असलेल्या त्यांचा संसार. मात्र ते सुखाने कधीच नांदले नाहीत. दोघांच्या वयातदेखील मोठे अंतर. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचे एकमत झाले, असे क्वचितच होई. या सर्वांमुळे टोकाचे वाद झाल्याने ७६ वर्षीय तुकाराम आणि ६० वर्षीय आशा यांना घटस्फोट हवा आहे. त्याचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे.


वृद्धांची घुसमट ओळखा

वृद्धांमधील घटस्फोटाची प्रकरणे संपविण्यासाठी प्रत्येक घरातून प्रयत्न व्हायला हवेत. लग्न झाल्यानंतर जोडप्याचे आई-वडील ज्याप्रमाणे त्यांच्यावर लक्ष ठेवतात. त्याच प्रमाणे आता मुलांनीदेखील वडीलधाºयांवर लक्ष ठेवावे. कौटुंबिक विषयावर त्यांच्याशी सतत संवाद साधवा. त्यांची घुसमट ओळखावी. ते म्हातारे झाले आहेत. त्यांच्या आयुष्यात आता काय राहिले, असा विचार न करता त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
- अ‍ॅड. झाकीर मनियार, ज्येष्ठ विधिज्ज्ञ (कौटुंबिक न्यायालय)

Web Title: Breaking up even in second inning, divorce claims for later increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.