Breaking News : बारामतीत २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:28 PM2021-07-24T16:28:50+5:302021-07-24T16:29:58+5:30
ओबीसी समाजाचा २९ जुलै रोजीचा एल्गार महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणारच : ओबीसी आरक्षण कृती समितीचा दावा
बारामती : बारामती शहरात २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.याबाबत आरक्षण कृती समितीला नोटीस देण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही. आपण कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य कराव्यात .आपण अथवा आपले हस्तकाकडुन कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तसेच त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत नोटीस दिली आहे.बारामती शहरात मोठया प्रमाणात कोविड बाधित रूग्ण आहेत. तसेच सध्या बारामती शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागु आहे.त्यानुसार विनापरवाना पाच किंवा पाच पेक्षा जास्त इसमांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारचे सर्व कार्यकम पूर्णत: बंद राहतील अशा स्वरूपाचे आदेश झालेले आहेत. त्या अनुषंगाने रोगाचे वाढीस आळा घालणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मोर्चासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाला परवानगी मागितली होती .परंतू आम्हाला ही परवानगी नाकारण्यात आली आहे. समाजाचा २९ जुलै रोजीचा एल्गार महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा दावा ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
समाजाला एकत्र येऊ दिलं नाही तर राज्यात ही ओबीसी समाज एकत्र यायला अडचण होईल. त्यामुळेच काही शक्ती यामागे प्रशासनाला पुढे करून हा एल्गार मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोचार्साठी नाना पटोले, विजय वडेट्टीवर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, राम शिंदे, योगेश टिळेकर, हे ओबीसी नेते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही छगन भुजबळ, यांना ही निमंत्रित केले आहे.
मोर्चा मध्ये कलमं १४४ चे हनन होत आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतू इतर समाजाचे मोर्चे, राजकीय कार्यक्रम चालूच आहे. त्यामुळेच ओबीसी हक्कासाठी उतरत आहे तर त्यांनाच फक्त कोरोनाचे कारण पुढं करून का थांबवलं जातं आहे. ओबीसी हा शांतताप्रिय समाज आहे बारामती मधील हा मोर्चा शांततेत पार पाडेल , अशी आरक्षण कृती समितीला असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
————————————