सलग दोन वर्षे उत्सवाची परंपरा खंडित, रामनवमी पाच भक्तांच्या उपस्थितीत साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:00 PM2021-04-21T18:00:10+5:302021-04-21T18:00:34+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल पासून मंदिर दर्शनासाठी बंद
लोणी काळभोर: तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे आज रामनवमी पारंपारिक पद्धतीने मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कोरोनाच्या साथीमुळे यावेळी महंत हेमंतपुरी महाराज यांच्यासमवेत फक्त पाच भक्त उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक १००८ देविपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी साठ वर्षांपुर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महंत हेमंतपुरी महाराज यांनी महामस्तकाभिषेक करून श्रींची आरती केली. दुपारी बारा वाजता रामजन्म झाल्यानंतर हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल पासून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आजही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. अशी पुर्व कल्पना सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यामुळे एकही भाविक मंदिरात आला नाही. यापुर्वी ढोल ताशांच्या गजरात " श्री " समवेेत धुंदीबाबा व मंगलपूूूरी महाराज यांच्या पादूूूकांंची मिरवणूक काढण्यात येत होती. याप्रसंगी परिसरातील भक्त गजनृत्य सादर करत असत. मिरवणूकीमध्ये लोणी काळभोर, फुरसुंगी गावातील नागरिकांसह पुणे, पिंपरी - चिंचवड, सातारा तसेंच परप्रांतातून भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी होत असे. दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. गेले दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. दरवर्षी येथे साधारण पंचवीस ते तीस हजार भाविक दर्शनासाठी येतात. रस्ता दिवसभर दुचाकी, चारचाकींनी वाहत असतो. परंतूू कोरोना पार्श्वभूमीवर सन २०२० व २०२१ ची रामनवमी मात्र खुपच शांततेत पार पडली. आज दुपारी शहर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तिर्थक्षेत्र रामदरा येथे भेट दिली.