परदेशी दौऱ्यांमुळे महापालिकेतील कामांना ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 02:01 AM2018-11-16T02:01:23+5:302018-11-16T02:01:47+5:30
आयुक्त, पदाधिकाऱ्यांसह २१ नगरसेवक दौऱ्यात सहभागी : सभा तहकूब
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्पेन येथील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, आयुक्त आणि तब्बल २१ नगरसेवक परदेश दौऱ्यावर गेले आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे मुळे मात्र दिवाळी सुट्टीनंतरदेखील महापालिकेचे कामकाज सुस्त झाले असून, उपस्थितीअभावी अनेक सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत पुणे महापालिकेचा समावेश आहे. देशातील स्मार्ट सिटीअतंर्गत राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्प, योजनांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व नव्याने काही योजना, प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी स्पेन येथील बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटीवर तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी बार्सिलोना शहराकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापौर मुक्ता टिळक यांना निमत्रंण आले, त्यानुसार महापालिका आयुक्त, महापौरांसह, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर सुधारण समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे आदी सर्वच पदाधिकारी आणि तब्बल २१ नगरसेवक स्मार्ट सिटीच्या या दौºयात सहभागी झाले आहेत. यामध्ये नगरसेवक स्वखर्चाने सहभागी झाल्याची चर्चा आहे. परंतु पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांच्या या परदेशदौºयामुळे महापालिकेचे कामकाज थंड पडले आहे.
उपस्थितीअभावी समित्यांच्या सभा तहकूब
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी स्पेन येथील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या परिषदेसाठी आयुक्त, महापौर, सभागृह नेते यांच्यासह विषय समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. याशिवाय सत्ताधारी भाजपाचे अन्य २१ नगरसवेकदेखील दौºयात सहभागी झाले आहेत. यामुळे या आठवड्यात घेण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समिती, स्थायी समिती, क्रीडा समिती आदी समित्यांच्या बैठका सदस्यांच्या उपस्थितीअभावी तहकूब करण्याची वेळ आली आहे.
पहिला आठवडा सुट्टीचा
दिवाळीमुळे महापालिकेला यंदा प्रथमच सलग ६ दिवस सुट्टी होती. यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुट्टीमध्येच गेला. त्यानंतर सोमवार (दि.१२) पासून महापालिकेचे कामकाज सुरु झाले. परंतु आयुक्तांसह, महापौर, सर्व पदाधिकारी आणि २१ नगरसेवक ९ नाव्हेंबर ते १८ नाव्हेंबरपर्यंत परेदश दौºयावर आहेत. यामुळे कामकाज सुरू होऊनदेखील लोकांची अपेक्षित कामे मात्र सुरू झालेली नाहीत.