शिक्रापूरला गावठी दारूचा सुळसुळाट
By admin | Published: May 12, 2017 04:42 AM2017-05-12T04:42:07+5:302017-05-12T04:42:07+5:30
पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. यास शिक्रापूर पोलीस ठाणेही अपवाद नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. यास शिक्रापूर पोलीस ठाणेही अपवाद नाही. मात्र, सणसवाडी परिसरात गावठी दारूचा महापूर आल्याची स्थिती आहे. शिक्रापूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात खुलेआम गावठी दारूविक्री चालू असूनही एकाही जमीनमालकावर अद्याप गुन्हे दाखल केले नसल्याची माहिती समोर येत आहे.
सणसवाडीमध्ये गावठी दारू मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या भट्ट्या असण्याची शक्यता आहे. सणसवाडीमध्ये पुणे-नगर महामार्गालगतच काही अंतरावर खुलेआम दारू धंदा चालू असून १० ते २० रुपयांना ग्लास विकला जात आहे तर ३५ लिटरचे एक कॅन सतराशे रुपयांना विकले जात आहे. महामार्गालगत अशी खुलेआम दारूविक्री करणाऱ्यांना अभय आहे तरी कोणाचे, हा सवाल मात्र अनुत्तरीत राहत असून अनेक धंद्यांवर लहान मुलेही दारू विकताना दिसतात.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारूधंदे खुलेआम तेही पुणे-नगर महामार्गलगत चालू असल्याबाबत पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू विकलीच जात नसून शिक्रापूर पोलिसांनी हॉटेल निवांत या ठिकाणी रेड मारून ६८०५ रुपयांची दारू जप्त करून राजू राकेश मंडल याला अटक केली असून एल अँड टी फाटा येथील पानटपरीवर दारूविक्री केल्याप्रकरणी ४४० रुपयांची दारू जप्त केली असून सहानू प्रतिमान राणा याला अटक केली असल्याचे सांगत परिसरात गावठी दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाई करू,असे सांगितले.
दरम्यान क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अवैध गावठी दारू धंद्याविरुद्ध २६ आॅक्टोबर २०१६ रोजी आंदोलनाचा इशारा देत ज्या गावामध्ये अवैध दारूविक्री चालू आहे. तेथील ग्रामसेवक, तलाठी, बिट अंमलदार, पोलीस निरिक्षक व तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अवैध दारूविक्री शिरूर तालुक्यात सर्रास चालू असूनही एकाही अधिकाऱ्यावर संजय पाचंगे यांनी का कारवाई केली नाही, हा सवाल नागरिक करू लागले असल्याने याबाबत संजय पाचंगे यांना विचारणा केली असता त्यांनी आपण १५ दिवसांत गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.