रेल्वे क्रॉसिंगचा मोकळा श्वास
By admin | Published: March 15, 2016 04:21 AM2016-03-15T04:21:01+5:302016-03-15T04:21:01+5:30
लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव
पुणे : लष्कराच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील लुल्लानगर तसेच घोरपडी येथील उड्डाणपुलासाठी महानगर पालिकेने दिलेल्या प्रस्तावास पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, हा प्रस्ताव आता दिल्लीतील डिफेन्स मिनिस्टर आॅफिसला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याला अंतिम मान्यता मिळ्णार आहे. या उड्डाणपुलामुळे या तीनही रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी फुटणार असून, या परिसरातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत. या तीनही उड्डडाणपुलांना लष्कराने आक्षेप घेतला होता.
या पुलांच्या मान्यतेसाठी सोमवारी दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. दरम्यान, घोरपडी येथील सोलापूर रेल्वे मार्गावरील पुलाच्या आराखड्याबाबत लष्काराने काही आक्षेप घेतले असून, या पुलाचा नवीन आराखडा महापालिकेस सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, वाहतूक नियोजन अधिकारी श्रीनिवास बोनाला, डिफेन्स एस्टेटच्या संचालिका सुंदरी पुजारी, ब्रिगेडियर त्यागी तसेच राज्यसभेतील खासदार अमर साबळे उपस्थित होते.
या उड्डाणपुलांबाबत डिसेंबर २0१५मध्ये पुण्यात झालेल्या बैठकीच्या पुढील कार्यवाहीसाठी आज दिल्लीत ही बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात घोरपडी येथील दोन उड्डाणपुलामधील मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावासदेखील पुणे सब एरियाकडून मान्यता मिळाली असून, लवकरच संरक्षण मंत्रालयातून त्यास अंतिम मान्यता मिळेल. तसेच सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाबाबत बी. टी. कवडे रस्त्यावर रुंदीकरणाचा एक पर्याय सुचविण्यात आला असून, त्याची व्यवहार्यता तपासून महानगरपालिकेने त्याचा अहवाल ३१ मार्च १६पर्यंत पुणे सब एरियाला सादर करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. या शिवाय, बाकी हिल ते वानवडी पोलीस स्टेशनदरम्यान पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनदेखील बैठकीत संरक्षणमंत्र्यांकडून मिळाले असल्याची शिरोळे यांनी सांगितले.
कोंडी फुटणार ...
या उड्डाणपुलामध्ये प्रामुख्याने घोरपडी गावातील दोन रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. सकाळी व सायंकाळी या क्रॉसिंगवर वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यातच या वेळेत रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची संख्याही अधिक असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाला रेल्वे गेट बंद होते. त्यानंतर घाईगडबडीने जाण्यासाठी वाहनचालकांची स्पर्धा असल्याने या क्रॉसिंगवर जीवघेणी वाहतूककोंडी होते.