सिंहगड रस्ता घेणार मोकळा श्वास
By admin | Published: March 5, 2016 12:54 AM2016-03-05T00:54:23+5:302016-03-05T00:54:23+5:30
वाहतूककोंडीने गुदमरलेला सिंहगड रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. या रस्त्यावरील वाहतूककोंडीची सद्य:स्थिती आणि त्यास जबाबदार असलेले घटक आणि ही कोंडी फोडण्यासाठी आवश्यक
पुणे : वाहतूककोंडीने गुदमरलेला सिंहगड रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. या रस्त्यावरील वाहतूककोंडीची सद्य:स्थिती आणि त्यास जबाबदार असलेले घटक आणि ही कोंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती ‘लोकमत’ने ‘रस्ता सिंहगडाचा;
चाल मात्र कासवाची’ या वृत्ताद्वारे समोर आणल्यानंतर ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांसह महापालिका
आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
या वृत्तानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वाहतूक पोलीस, तसेच महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत शुक्रवारी दुपारनंतर दत्तवाडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त रवी पवार यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी केली. तसेच या दोन्ही विभागांकडून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महापालिकेकडून वाहतूककोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, अतिक्रमणे तसेच चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूककोंडीने गंभीर रूप धारण केलेले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करणे शक्य असून त्याला ‘लोकमत’ने वाचा फोडलेली होती. त्याची दखल घेत महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यात प्रामुख्याने वडगाव स्मशानभूमीजवळ पोलिसांनी जप्त केलेली वाहने रस्त्यावरून हटविणे, मुख्य रस्त्यावर थांबणाऱ्या प्रवासी रिक्षांवर दंडात्मक कारवाई करणे, वर्दळीच्या वेळी रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, याशिवाय पदपथांवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करणे
अशा प्रकारची संयुक्त कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)पथारी व्यावसायिकांचेही
लवकरच पुनर्वसन
या रस्त्यावर प्रामुख्याने पदपथ तसेच मुख्य रस्त्यावरच पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत असून त्यांच्या पुनर्वसनाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असून महिन्याभरात ही कारवाई पूर्ण केली जाईल. तसेच या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही, याबाबतही उपाययोजना केल्या जातील.
- रवी पवार, महापालिका सहायक आयुक्त,
टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. ‘लोकमत’ने याचे वास्तववादी चित्रण मांडले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने पक्षाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यास सहकार्य करण्यात येईल.
- रूपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी