झाडांचा श्वास कोंडला

By Admin | Published: July 21, 2015 03:23 AM2015-07-21T03:23:56+5:302015-07-21T03:23:56+5:30

झाडांवर जाहिरातींचा भडिमार, ठोकण्यात येणारे खिळे, झाडाची पूर्ण वाढ होऊनही न काढलेल्या जाळ््या, स्थापत्य विभागाच्या कामामुळे

Breathing of the plants | झाडांचा श्वास कोंडला

झाडांचा श्वास कोंडला

googlenewsNext

पुणे : झाडांवर जाहिरातींचा भडिमार, ठोकण्यात येणारे खिळे, झाडाची पूर्ण वाढ होऊनही न काढलेल्या जाळ््या, स्थापत्य विभागाच्या कामामुळे झाडांच्या बुंद्यांपर्यंत केलेले काम. यामुळे शहर परिसरातील झाडांचा श्वास गुदमरत आहे; मात्र याक डे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, लोकमत टीमने शहरातील झाडांची पाहणी केली असता त्यामध्ये या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

शहरामध्ये झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परिसर पूर्णपणे हिरवागार दिसतो. झाडांची काळजी घेण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या वृक्षसंर्वधन समितीचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेली नवीन झाडांची देखभाल होत नसल्यामुळे त्याची व्यवस्थित वाढ होत नाही. त्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नाहीत. जुन्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना नवीन झाडांची काळजी घेण्यात येत नसल्याने हिरवेगार पुणे दिसणार की नाही, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात वाहनसंख्या असल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी झाडांची संख्या हा महत्त्वाचा विषय आहे. शहरात प्रचंड मोठी झाडे दिसतात. मात्र, ती अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यांच्यावरून केबलच्या वायरी टाकलेल्या आहेत; तर अनेक ठिकाणी विद्युत तारांमध्ये झाडे अडकलेली आहेत. विद्युत तारांमध्ये गेलेल्या झाडांच्या फाद्या विद्युत विभागाकडून तोडण्यात येत नसल्यामुळे विद्युतप्रवाह नियमित खंडित होतो. त्यामुळे झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झाडांच्या वाळलेल्या फांद्या नियमित तोडण्यात येत नसल्यामुळे अनेक गाड्यांवर झाडे पडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे झाडांची हानी प्रचंड होत आहे. त्यामुळे शहरातील झाडांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. झाडांचे संवर्धन हा महत्त्वाचा विषय असतानासुद्धा त्याकडे दुर्लक्ष होणे हे परवडणारे नाही.

शहरातील सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता,
टिळक रस्ता, विद्यापीठ रस्ता, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, सिंहगड रस्त्यावरील झाडांची पाहणी केली. त्यामध्ये सर्व रस्त्यांवर सारखीच परिस्थिती आहे. शहराच्या उपनगरांमध्येही यापेक्षा वाईट परिस्थिती
आहे. अनेक सोसायट्यांमध्ये कचरा होतो.
म्हणून झाडांची कत्तल होत आहे.
जाळ््यांमुळे झाडांना धोका

नवीन झाडे लावण्याच्या वेळी त्याचे जनावरांपासून संरक्षण व्हावे, त्याची वाढ नीट व्हावी, यासाठी त्याला महापालिकेच्या वतीने जाळ््या लावण्यात येतात. लहान असताना झाडाला आधार देणाऱ्या याच जाळ््या नंतर झाडांच्याच वाढीसाठी अडथळा ठरत आहेत. झाडांची १० ते १५ फूट वाढ झाल्यानंतर त्या जाळ््या काढून घेतल्या पाहिजेत; परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहराच्या अनेक भागात पाहणी केली असता जाळ््या तोडून झाडाचे खोड त्यातून बाहेर आलेले आहे. त्यामुळे जाळ््या पूर्णपणे झाडांमध्ये घुसल्या आहेत. त्या काढण्यासाठी गेले तर झाडच पाडावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जाहिरातींचा भडिमार

शहरात नियमित अनधिकृत जाहिरातींचा विषय गाजत असतो. जाहिरातदारांनी जाहिरात करण्यासाठी नवीन फंडा शोधून काढला आहे. त्यामध्ये झाडांवर मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जात आहेत. त्यामध्ये मोठे फ्लेक्स बांधलेले दिसून येतात; तर छोट्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात लावलेल्या असतात. त्यातच अनेक पत्रेही झाडांच्या खोडावर लावलेले असतात. खिळे ठोकून मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे पोस्टर लावलेले दिसतात. याकडे हे महापालिका लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. छोट्या जाहिरातीमुळे झाडांचे विद्रुपीकरणही मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्यात येत असले तरी ते लावणाऱ्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. झाडांना ठोकलेले खिळे वर्षानुवर्षे तशाच अवस्थेत असतात. ते काढून टाकण्यात येत नाहीत. त्यामुळे झाडांना धोका निर्माण होत असला तरी त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. झाडांच्या या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात महापालिकाच जबाबदार आहे.

‘स्थापत्य’चे काम झाडांच्या मुळापर्यंत
स्थापत्य विभागाने पदपथाचे काम करताना झाडांच्या जवळ जागाच सोडली नाही. झाडांच्या मुळांवर विटा चढवून बांधकाम केले आहे. त्यामुळे मोठ्या झाडांची वाढ खुंटली आहे. नियमाप्रमाणे झाडांच्या मुळांजवळ मोकळी जागा सोडणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. सरसकटपणे झाडांना चारही बाजूंनी सिमेन्टमध्ये पॅक करून टाकले आहे. त्यामुळे मुळांची वाढ होत नाही. झाडांनाही धोका निर्माण होतो. बांधकाम करताना झाडाजवळ जागा सोडणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामध्ये त्यांना पाणी, खत टाकता येते. मोकळ््या जागेमुळे खोडाची वाढ व मुळांची वाढ पूर्ण होते. मात्र, ते पूूर्ण पॅक करून घेतल्यामुळे झाडे सुकत आहेत.

Web Title: Breathing of the plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.