सारसबागेने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:55 AM2018-04-28T06:55:54+5:302018-04-28T06:55:54+5:30
प्रथमच मोठी कारवाई : खाद्यपदार्थांचे सर्व स्टॉल जेसीबी लावून पाडले
पुणे : सारसबाग चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी ऐन हंगामात धडक कारवाई करत सर्व स्टॉल जेसीबी लावून पाडण्यात आले. या कारवाईमध्ये ४५० खुर्च्या व २५० टेबल जप्त करण्यात आले. परवानगीपेक्षा अधिक जागेत अतिक्रमण करू नये, अशा स्पष्ट सूचना स्टॉलधारकांना देण्यात आल्या.
सारसबागेचा गणपती (तळ्यातला गणपती) म्हणून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे येथे शहरासह बाहेरील पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक कारवाई करून येथील स्टॉलधारकांच्या ४५० खुर्च्या आणि २५० टेबल जप्त केले. तसेच स्टॉलच्या समोर टाकण्यात आलेले शेड जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून आमचे नुकसान करू नका, शेड काढण्यास आम्हाला थोडा वेळ द्या, अशी मागणी येथील स्टॉलधारकांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे पाहून काही जणांनी जेसीबीच्या समोर जाऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला करून शेड पाडण्याची कारवाई सुरूच ठेवली.
या कारवाईत उपअभियंते किशोर पडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कर्मचारी, ६ ट्रक, १ जेसीबी, १० पोलीस यांनी सहभाग घेतला. पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना स्टॉलधारकांना देण्यात आल्या आहेत. न ऐकल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी माहिती पडाळ यांनी दिली आहे.
या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले येत असतात. याशिवाय सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक वॉकिंगसाठी सारसबागेत येतात. परंतु या परिसरात व चौपाटीवर स्टॉलधारकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बागेत येणाºया नागरिकांना, पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच येथे वाहतूककोंडी देखील होते. वारंवार सूचना देऊनही येथील स्टॉलधारकांकडून त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण केले जाते. हे अतिक्रमण दिवसेंदिवस रस्त्यांच्या बाजूने वाढतच जात आहे. स्टॉलच्या समोर पार्किंगच्या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल ठेवण्यात आल्याने दुचाकीधारक आणि स्टॉलधारक यांच्यात वादावादी झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.