नगररस्त्याचा गुदमरतोय श्वास; पुणे महामेट्रोच्या कामामुळे कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:59 AM2019-01-31T02:59:50+5:302019-01-31T03:00:46+5:30
वाहतूककोंडीचा सर्वसामान्यांसोबत रुग्णांनाही करावा लागतोय सामना
- विशाल दरगुडे
चंदननगर : नगररस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येला सामान्य नागरिकांसोबतच रुग्णवाहिकांनाही सामोरे जावे लागत आहे. नगररस्त्यावर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. नगररस्त्यावर शुक्रवारी रात्री दोन वाजेपर्यंत (मध्यरात्रीपर्यंत) वाहतूककोंडी झाली होती. यात चार रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या.
पुणे शहरात शासकीय ससून रुग्णालय तसेच खासगी जहांगीर रुग्णालय, रुबी हॉल रुग्णालय ही प्रसिद्ध रुग्णालये असून त्यासाठी शिरूर तालुक्यासह नगर, औरंगाबाद येथून असंख्य रुग्ण रुग्णवाहिकेच्या साह्याने शहरात उपचारांसाठी येत असतात; परंतु नगररस्त्यावर दोन महिन्यांपासून मेट्रोचे काम चालू असल्याने बीआरटी मार्ग हा पूर्णपणे बंद केल्यामुळे नगररस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.
अनेक वेळा नगररस्त्यावर, येरवडा, शास्त्रीनगर, चंदननगर, विमाननगर, खराडी बायपास पुणे-नगर महामार्गावर रुग्णवाहिकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. हृदयविकार, अपघात, प्रसूती, विषवाधा, सर्पदंश आदी उपचारांची तत्काळ आवश्यकता असलेल्या तातडीच्या रुग्णांना जवळील रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. यामध्ये हृदयविकार आणि अपघातातील रुग्णांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते.
या रुग्णांना घेऊन चाललेल्या रुग्णवाहिका अशा वाहतूककोंडीत अडकल्या तर रुग्णांचा जीव धोक्यात येतो. त्यातच काही वेळा चौकात रहदारी असल्याने सायरन कितीही वाजवला, तरी नागरिक रस्ता देत नाहीत. यावर तोडगा काढण्यात प्रशासन कमी पडत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
कोंडी सोडविण्यासाठी वाघोली कृती समितीचे प्रयत्न
वाघोलीमध्ये सोमवारी सकाळी ७ पासून रस्ता खोदल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाघोली नागरिक कृती समितीचे संपत गाडे, गणेश तांबे आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या बरोबरीने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तीन तास प्रयत्न केले. त्यामुळे नगर, औरंगाबादला जाणारी वाहने तसेच शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांचा त्रास कमी केला.
नगर रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे त्याला पर्याय म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यातील अंतर्गत सर्व रस्ते विकसित करण्याचे काम सध्या सुरू असून विमाननगरमधील ५ रस्त्यांपैकी विकास आराखड्यातील २ रस्ते वाहतुकीला खुले केले आहेत. त्यामुळे अनेक वाहने नगररस्त्यावर येत नाहीत. त्याचप्रमाणे, खराडी ते शिवणे रस्त्याचे काम येरवडा ते खराडीदरम्यान वेगाने सुरू असून हा रस्तादेखील लवकरात लवकर सुरु करण्यासाठी अधिकाºयांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्यामुळे खराडी ते शिवणे रस्त्याचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे येणाºया काळात नगररस्त्यावर वाहतूककोंडी फोडण्यासाठी सर्व उपाययोजना सुरू असून, नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी येत्या काही महिन्यांत सुटणार आहे.
-जगदीश मुळीक, आमदार
नगररस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोल्फ क्लब चौक येथे १४ कोटीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच खराडी ते शिवणे रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून तेही येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. गेल्या महिन्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांच्यासमवेत नगररोडवरील येरवडा चौक, शास्त्रीनगर चौक, रामवाडी चौक, विमाननगर चौक, चंदननगर चौक, दर्गा खराडी या चौकांचे विस्तारीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून त्याबाबतही बैठकाही झाल्या आहेत. नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून असून त्याचा वाहतुकीला अडथळा होत असून ती हटविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. नगररस्त्यावर खासगी बसमुळे वाहतूककोंडी होते. त्यांच्यावरही कारवाई करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्तांना केली आहे.
- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष पुणे महापालिका
सत्ताधाºयांनी गेल्या चार वर्षांत नगररस्त्यावरील वाहतूककोंडीवर उपाययोजन न केल्यामुळे आज अशी भयाण परिस्थिती उद्भवली आहे. महामेट्रोला व नगररस्ता वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एकमेव खराडी ते शिवणे हा रस्ता मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. नगररस्त्यावर सातत्याने कुठे-कुठे खोदकाम सुरू असते. ते काम करताना वाहतुकीचे नियोजनही केले जात नाही. - बापूसाहेब पठारे, माजी आमदार
नगररस्त्यावर रामवाडीपासून खराडीपर्यंत ओला, उबरच्या खासगी व्यवसाय करणाºया गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या असतात त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. या वाहनांमुळे नगर रस्त्याला वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच नगर रस्ता हा एक प्रकारे बेकायदेशीर वाहनतळ बनला आहे.
- मुक्ता अर्जुन जगताप, नगरसेविका
विमाननगर-सोमनाथनगर प्रभाग क्रमांक ३
प्रशासन नगररस्ता परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळत असून, महामेट्रोच्या कामापूर्वी वाहतुकीला पर्यायी मार्गाचे नियोजन करणे अपेक्षित होते; पण ते न केल्याने आज नगररस्त्यावरील वाहतुकीचा खेळखंडोबा सत्ताधाºयांनी केला आहे.
- भैयासाहेब जाधव, नगररसेवक खराडी-चंदननगर
रामवाडी सिद्धार्थनगर वस्ती नगररोड ते एअरपोर्ट रोडमधील सहा मीटरचा रस्ता ताब्यात घेतलेला असून सध्या रोडचे काम सुरू आहे या रोडमुळे विमाननगरकडे जाणारा व विमानतळाकडे जाणारा वाहतुकीसाठी पूर्णपणे हयात चौकात साकोरेनगरहून फिरून जात होते. तो पूर्ण ताण कमी होणार असून विमाननगर अंतर्गत ट्रॅफिकसुद्धा कमी होणार आहे.
- श्वेता महेश गलांडे, नगरसेविका विमाननगर-सोमनाथनगर
महामेट्रोच्या कामामुळे नगररस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असून महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांसह संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, हा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे.
- महेंद्र पठारे, नगररसेवक,
खराडी-चंदननगर
च्पुणे-नगर महामार्गावर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी तब्बल काही तास वाहतूककोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. नोकरदारांना व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
नगररस्त्यावरील सिग्नल सौरऊर्जेवर चालू असून हे सिग्नल सातत्याने बंद पडत असतात सौरऊर्जेच्या पॅनलवर मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यामुळे सोलारमधून ऊर्जा वीजनिर्मिती होत नाही; त्यामुळे नगररस्त्यावरील सर्व सिग्नल सातत्याने बंद पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकही संभ्रमात पडतात. त्यामुळे वाहतूककोंडी फोडताना खूप त्रास होतो. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच विमाननगर चौकातील महापालिकेने उभारलेल्या कॉर्नरमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. हा कॉर्नर काढण्यासाठी आम्ही महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगररस्ता विमानतळ वाहतूक विभाग