अपंग पिडीतेकडे मागितली लाच
By admin | Published: June 10, 2015 04:46 AM2015-06-10T04:46:16+5:302015-06-10T04:46:16+5:30
सरकारी अधिका-यांच्या मानसिक अपंगत्वाचा अनुभव तिला येतो...लाचेची झालेली मागणी ऐकून ती पुन्हा परत फिरते...निराश आणि हताश मनाने.
पुणे : ‘ती’ दोन्ही पायांनी अपंग...परावलंबीत्व नको म्हणून एका ज्वेलरी डिझाईनच्या प्रशिक्षणासाठी ती गेली...तेथेच तिच्या अपंगत्वाचा फायदा घेत नराधमाने बलात्कार केला...याप्रकरणी गुन्हा दाखल होतो...शासकीय ‘मनोधैर्य’ उंचावणा-या मदतीची रितसर प्रक्रिया पार पडते...ही मदत घ्यायला ती जाते...मात्र तिथेही तिच्या पदरी असंवेदनाच पडते...सरकारी अधिका-यांच्या मानसिक अपंगत्वाचा अनुभव तिला येतो...लाचेची झालेली मागणी ऐकून ती पुन्हा परत फिरते...निराश आणि हताश मनाने.
सरकारी कातडी किती असंवेदनशील आहे हे दर्शवणारी कारवाई सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून श्रीकांत अंकुश सावंत (वय ४२, रा. धानोरी) या समाजकल्याण निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या मोठ्या बहीणीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी (वय २३) भटक्या विमुक्त समाजातील आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेली ही तरुणी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता तळेगाव येथे ज्वेलरी डिझायनिंगच्या कोर्ससाठी गेली होती. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅस्ट्रॉसिटी) कलमही लावलेले आहे.
तिच्या प्रस्तावानुसार शासनाने ‘मनोधैर्य’ योजनेनुसार मदत देऊ केली. एकूण एक लाख २० हजारांची मदत मंजूर झाली असून यातील ६० हजारांचा पहिला धनादेश आला आहे. दुसरा हप्ता खटल्याच्या निकालानंतर मिळेल असे सांगत पहिला हप्ता घेऊन जाण्यासंदर्भात या पिडीत तरुणीला कळवण्यात आले. त्यानुसार ही पिडीत तरुणी बहीणीला घेऊन समाजकल्याण विभागाच्या स्वारगेट कार्यालयामध्ये गेली. समाजकल्याण निरीक्षक असलेल्या सावंत याने पिडीत तरुणीसह तिच्या बहीणीकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. बलात्कारासारखी घटना अनुभवलेल्या पिडीतेकडे लाच मागण्यात येते हे या दोघींनाही धक्कादायक होते. तेथून निघून आलेल्या पिडीत तरुणीच्या बहीणीने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे याची लेखी तक्रार दाखल केली.
त्यानंतर एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत ठाकुर, जगदीश सातव, विनोद झगडे आणि बोराडे यांनी समाजकल्याण कार्यालयामध्ये सापळा लावला. दरम्यान, या अधिका-यांनी केलेल्या पडताळणीमध्ये सावंत याने तडजोडीअंती चार हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. आपल्यावर एसीबीची कारवाई होण्याची कुणकुण लागताच पैसे न घेताच सावंत पसार झाला. एसीबीने लाच मागितल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, अर्जुन सकुंडे, जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.