कोरोना महामारीतही 'लाचखोरी' जोरात, पोलीस सर्वात पुढे; पुणे जिल्ह्यात ५ महिन्यात २१ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:16 AM2021-05-30T07:16:00+5:302021-05-30T07:20:02+5:30
संपूर्ण समाज भयग्रस्त असताना सरकारी अधिकारी, कर्मचार्यांच्या लाचखोरीत काही कमी झाली नाही....
विवेक भुसे-
पुणे : कोरोनाचे महासंकट येऊन १५ महिन्यांचा काळ लोटला आहे़ सर्व समाजाला या कोरोनाने वेठीस धरले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर आता यावर्षी पुन्हा दोन महिने लॉकडाऊनमध्ये गेले आहेत. संपूर्ण समाज भयग्रस्त असताना सरकारी अधिकारी, कर्मचार्यांच्या लाचखोरीत काही कमी झाली नाही. उलट अधिक वाढत चालल्या आहेत. उलट गेल्या दोन महिन्यात लाखखोरीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
२०२१ मधील पहिल्या पाच महिन्यांपैकी जवळपास दोन महिने पुणे शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रमुख व्यवहार बंद आहेत. असे असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक सापळा कारवाया झाल्या आहेत. गेल्या वर्षी २३ मेपर्यंत २० कारवाया झाल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून सर्व समाज कोरोनामुळे त्रस्त आहे, असे असतानाही सरकारी अधिकारी, कर्मचार्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. उलट कोरोनाचा गैरफायदा घेऊन ते नागरिकांना अधिक त्रास देत असल्याचे दिसून आले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे, असे असतानाच पुणे शहरात गेल्या ५ महिन्यात सर्वाधिक लाचखोरी होत असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील २१ सापळा कारवायांपैकी ८ सापळा कारवाया पुणे शहरात झाल्या आहेत.
आरोग्य विभागही नाही मागे
कोरोना काळात बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका जीवावर उदार होऊन काम करीत असताना हॉस्पिटलमधील झारीतील शुक्राचार्य मात्र लाचखोरी करण्यात दंग आहेत. कोरोना पश्चात फॉर्मच्या छपाईचे बिल काढण्यासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला २० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. जनआरोग्य योजनेनुसार मोफत उपचार असतानाही पवना हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून १० हजाराची लाच घेताना डॉक्टराला पकडण्यात आले. तसेच कामगारांची अँटी जन चाचणी केली असताना त्याचे रिपोर्ट देण्यासाठी दौंडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला लाच घेताना पकडण्यात आले आहे.
.........
पुणे जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वर्ष सापळा कारवाई आरोपी
२०१८ २०० -
२०१९ १८४ २५८
२०२० १३९ १९५
२०२१ २१ ३०
(२३ मे अखेर)
.....
कोरोना काळात सापळा कारवाई
विभाग कारवाया
पोलीस ६
महसूल ३
आरोग्य ३
महावितरण २
आरटीओ, विधी व न्याय, भूमापन, सहकारी संस्था, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेखा, पाटबंधारे (प्रत्येकी १)