बारामतीत अतिक्रमण कारवाईचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:28 AM2017-08-11T02:28:03+5:302017-08-11T02:28:03+5:30
बारामती शहरात रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत आज अचानक सकाळपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यालगत लावलेले दुकानांचे फलक, होर्डिंग, हातगाड्या, टपऱ्या आदींवर कारवाई करण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलदेखील उचलण्यात आल्याने बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
बारामती : बारामती शहरात रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत आज अचानक सकाळपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यालगत लावलेले दुकानांचे फलक, होर्डिंग, हातगाड्या, टपऱ्या आदींवर कारवाई करण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलदेखील उचलण्यात आल्याने बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तर, अचानक केलेल्या या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांची धांदल उडाली.
प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता जीवन केंजळे, रत्नरंजन गायकवाड, आर. पी. शहा, पाणीपुरवठ्याचे विजय सूर्यवंशी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनिल धुमाळ, आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे, आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, अतिक्रमण आणि अरोग्य विभागाचे कर्मचाºयांनी ही मोहीम राबविली.
बारामती शहराच्या नव्या, जुन्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांनी नाराजी, संताप व्यक्त केला. या अतिक्रमण मोहिमेत वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल देखील काढण्यात आले. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. संघटनेचे अध्यक्ष विजय सणस यांनी सांगितले की, वृत्तपत्रांचे स्टॉल फक्त सकाळी असतात. त्या ठिकाणी गर्दी नसते. त्यामुळे या स्टॉलवर कारवाई करणे योग्य नाही.
प्रशासनाचे लक्ष फक्त भिगवण रस्त्यावरच...
मागील अनेक वर्षांपासून प्रशासन भिगवण रस्त्यावरच विशेष लक्ष देते. आज देखील अतिक्रमण कारवाई करताना रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत कारवाई केली. भिगवण रस्त्याचे पदपथ, सेवा रस्ता, फुटपाथ, झाडांचे संगोपन आदींच्या बाबतीत या रस्त्यालाच फार महत्त्व दिले जाते. अतिक्रमण मोहीम राबविताना किमान स्टॉल धारकांना अगोदर सुचित केले असते तर त्यांचे नुकसान झाले नसते.
पुन्हा हॉकर्स झोनचा प्रश्न ऐरणीवर....
सध्या बेरोजगारीचा भेडसावत आहे. त्यामुळे अनेक तरुणांनी छोटे, मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. नगरपालिकेने हॉकर्स झोन करून त्यांना हक्काची जागा देण्याची गरज आहे. राज्य शासनाचे तसे आदेश आहेत. परंतु, दोन वर्षांपूर्वी फक्त सर्वे करण्यात आला. हॉकर्स झोनची अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे. त्यामुळे अतिक्रमण अगदी रस्त्यावर आले. तेव्हा कारवाई सुरू करण्यात आली. नगरपालिका प्रशासनाने हॉकर्स झोनचा प्रश्न देखील तातडीने सोडवावा, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांमधून होत आहे.
टपऱ्या काढल्या... अनधिकृत बांधकाम जैसे थे...
याच रस्त्याच्या परिसरात अनाधिकृत बांधकामाच्या बाबतीत मागील महिन्यात तक्रार करण्यात आली होती. वृत्तपत्रांमध्ये त्याचे बातमी प्रसिद्ध झाली. मागील त्या बांधकामाला नगरपालिकेकडून अभय देण्यात आले. केवळ पोलिसात तक्रार केली. संबंधित मालकाने बांधकाम पूर्ण केले. टोलेजंग इमारत अगदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर बांधण्यात आली. अतिक्रमण काढताना या सर्वावरच कारवाई करावी, अशी देखील मागणी होत आहे. सेवा रस्त्याला लागून देखील गाळे काढण्यात आले आहेत. हीच परिस्थिती रिंगरोडला आहे. सध्या भरत असलेल्या मंडईच्या समोर असलेल्या इमारतीच्या पाठीमागच्या बाजुला चक्क पक्के गाळे फुटपाथला लागून काढण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकची कोंडी होती.