लाचखोर पोलीस कर्मचारी जाळ्यात
By admin | Published: December 5, 2014 05:04 AM2014-12-05T05:04:23+5:302014-12-05T05:04:23+5:30
चोरीचा मोबाईल तरुणाकडे आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाईची धमकी देत ५० हजार मागून ३० हजार
पुणे : चोरीचा मोबाईल तरुणाकडे आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाईची धमकी देत ५० हजार मागून ३० हजार उकळणाऱ्या समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. आपल्याला पकडायला अधिकारी आल्याचे लक्षात येताच रस्त्याने पळत सुटलेल्या या कर्मचाऱ्याला पाठलाग करून पकडल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
गणेश बाळासाहेब शिंदे (वय २७, रा. सोमवार पेठ, पोलीस वसाहत) असे अटक पोलिसाचे नाव आहे. तो सध्या समर्थ पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. तो २०१० मध्ये शहर पोलीस दलात भरती झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेल्या तरुणाची आणि त्याच्या मित्राची अॅपल मोबाईलविषयी बोलणी सुरू होती. त्यांच्यातील बोलणे शिंदे याने ऐकले होते. या तरुणाला धमकावत ‘हा मोबाईल चोरीचा आहे. तू जर मला ५० हजार दिलेस तर तुझ्यावर कारवाई होणार नाही.’ असे सांगत मोबाईल स्वत:च्या ताब्यात घेतला. कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी केली. या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीला अनुसरुन अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयासमोर सापळा लावण्यात आला. (प्रतिनिधी)