दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:11 AM2021-01-15T04:11:16+5:302021-01-15T04:11:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला हवालदाराला रंगेहाथ पकडले.
श्रद्धा शरद अकोलकर (वय ३५) असे लाचखोर महिलेचे नाव आहे. अकोलकर सध्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या भावाच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचे दोषारोप पत्र (चार्जशिट) लवकर पाठविण्यासाठी अकोलकरने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी १३ व १४ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यात अकोलकरने तडजोड करून ५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना श्रद्धा अकोलकरला रंगेहाथ पकडण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.