वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:33 PM2022-05-23T21:33:37+5:302022-05-23T21:34:03+5:30
वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे
बारामती : वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे .सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले (वय ४९) होमगार्ड सनी शामराव गावडे या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे . यातील उगले यांना अटक कऱण्यात आली आहे. एका वाॅरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती.
तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली .त्यानुसार वाॅरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. यासाठी उगले याने लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . त्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दरम्यान , शासकिय अधिकारी-कर्मचाऱयांनी लाचेची मागणी केल्यास एसीबीशी संपर्क साधावा ,असे आवाहन या विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.