लाच प्रकरणातील लांडगेंच्या जामिनावर ३० ऑगस्टला निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:48+5:302021-08-28T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुन्ह्याच्या तपासादरम्यान ‘ते १६ जण’ कोण? हे स्पष्ट झाले आहे. ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्ह्याच्या तपासादरम्यान ‘ते १६ जण’ कोण? हे स्पष्ट झाले आहे. ते सर्व जण हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे सभासद असून, त्यांच्याकडे चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडील चौकशी होत नाही तोपर्यंत पाच जणांना जामिनावर सोडू नये. गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी पूर्ण संधी दिली गेली पाहिजे. सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे. त्यामुळे गुन्ह्यात कोणाचा सहभाग नाही असे म्हणता येणार नाही. जर आरोपींना जामीन दिला तर ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ॲड. रमेश घोरपडे यांनी केला.
जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, जामीन अर्जावर सोमवारी (दि. ३०) निकाल देण्यात येणार आहे, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंगची वर्कऑर्डर देण्यासाठी १० लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती सहा लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया यांना अटक केली होती. दरम्यान, पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर लांडगे यांच्यातर्फे ॲड. प्रताप परदेशी, ॲड. गोरक्षनाथ काळे, तर उर्वरित आरोपींतर्फे ॲड. विपुल दुशिंग, ॲड. कीर्ती गुजर, ॲड. संजय दळवी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. तपासात सहकार्य करू, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. या अर्जाला ॲड. घोरपडे यांनी विरोध केला. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत या जामीन अर्जावरील निकाल ३० ऑगस्टपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. तोपर्यंत पाचही जणांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.