लाचखोर आयएएस आधिकारी अनिल रामोडला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 04:34 PM2023-06-10T16:34:56+5:302023-06-10T16:37:45+5:30

अपर महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते...

Bribery IAS officer Anil Ramod remanded to CBI custody till June 13 pune crime | लाचखोर आयएएस आधिकारी अनिल रामोडला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

लाचखोर आयएएस आधिकारी अनिल रामोडला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

googlenewsNext

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (cbi raid in pune) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अपर महसूल विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (anil ramod bribe case) याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यापाठोपाठ त्याच्या शासकीय निवासस्थानाबरोबर खासगी निवासस्थानी छापे घातले. त्यात ६ कोटींपेक्षा जास्त रुपयांची रोकड तसेच त्याच्या व कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या १४ स्थावर मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत केली होती. आज दुपारी (१० जून) रामोडला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल रामोडकडे २ हजार आणि ५०० च्या नोटांच्या स्वरूपास ६ कोटी ५४ लाख रुपये सापडले होते. डॉ. अनिल रामोड हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे. त्याची अपर विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती असली तरी त्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लवाद म्हणून (आरबीट्रेटर) काम आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी लागणार्‍या भू संपादनातील वाद हे त्यांच्याकडे येतात. त्यातून जमीन मालक व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे योग्य तो न्यायनिवाडा करण्याचे व जमिनीचा मोबदला ठरविण्याचे काम त्याच्याकडे येते.

लवादाचे हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यात माळशिरस येथील शेतकर्‍यांनी भूसंपादनात अधिक मोबदला मिळावा, म्हणून दाद मागितली होती. त्यात नुकसानभरपाईच्या १० टक्के रक्कमेची मागणी अनिल रामोड याने केली होती. तक्रारदाराला अंदाजे १ कोटी २५ लाख रुपयांची वाढीव भरपाई देण्यासाठी रामोड याने तक्रारदाराकडे १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. शेवटी तडजोड होऊन ८ लाख रुपये लाच घेताना सापळा रचून अनिल रामोडला पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या घरी घातलेल्या धाडीमध्ये डोळे फाडतील अशी संपत्ती आढळून आली.

Web Title: Bribery IAS officer Anil Ramod remanded to CBI custody till June 13 pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.