लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 02:20 PM2023-08-08T14:20:19+5:302023-08-08T14:21:17+5:30
सोमवारी पुणे पोलिसांनी दराडेंना अटक केली होती...
- किरण शिंदे
पुणे : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा आमिषाने 44 जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना हडपसर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली होती. दराडे यांना आज कोर्टात हजर केले असता 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शैलजा दराडे यांनी 2019 साली नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 लोकांकडून पैसे स्वीकारले. तलाठी आणि आरटीओ परीक्षेत पास करण्याचे अमिश दाखविले आणि वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 4 कोटी 85 लाख रुपये स्वीकारले. यासंदर्भातील त्यांचे काही ऑडिओ जप्त करण्यात आले आहेत. या ऑडिओतील आवाजाची सत्यता तपासण्यासाठी 7 पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
शैलजा दराडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पैशाचा अपहार केला. हुशार विद्यार्थ्यांना डावलून
पात्रता नसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरी लावली असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे पैशाच्या आमिषाने दराडे यांनी आणखी काही लोकांना नोकरी लावली का? असा प्रश्न आहे. खोटी आश्वासने देत त्यांनी 4 कोटी 85 लाख स्वीकारले. हे पैसे त्यांनी कुठे ठेवले, या पैशातून त्यांनी काही मालमत्ता विकत घेतली का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शैलजा दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोपट सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.