लाचखोरीत महसूल विभाग अव्वल
By admin | Published: January 7, 2016 01:33 AM2016-01-07T01:33:16+5:302016-01-07T01:33:16+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवांयामध्ये डिसेंबरपर्यंत तब्बल २१७ सापळा कारवाया झाल्या आहेत.
लोणी काळभोर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवांयामध्ये डिसेंबरपर्यंत तब्बल २१७ सापळा कारवाया झाल्या आहेत. लाचखोरीत महसूल विभाग अव्वल असून, ६५ सापळा कारवायांमध्ये ८१ जणांवर गुन्हे दाखल आहेत. लाचखोरीची रक्कम १ कोटी ६२ लाख ४ हजार ७१८ रुपये आहे.
पुणे विभागात दुसऱ्या स्थानी पोलीस खात्याच्या गृह विभागाने झेप घेतली असून, त्यामध्ये ५२ सापळा कारवाया व ६८ जणांवर गुन्हे दाखल झालेले असून त्यामधील लाचखोरीची रक्कम ४ लाख ५२ हजार ५०० रुपये आहे. पुणे विभागातील सर्वांत जास्त तक्रारी महसूल व गृह विभागांविषयी असल्याने महसूल व पोलीस विभागांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या आकडेवारीनुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा विभाग लाचखोरीत प्रथमस्थानी आहे. भूमी अभिलेख विभागात १४ सापळा कारवाया झाल्या असून, त्यात १५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा परिषद विभागात ९ सापळा कारवाया झाल्या असून, १२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. परिवहन विभागात ३ सापळा कारवाया झाल्या असून, त्यामध्ये ६ जणांवर गुन्हे दाखल आहेत. १२ हजार ४०० रुपये यातील लाचखोरीची रक्कम आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागात १२ सापळा कारवाया झाल्या असून त्यात १५ जणांवर
गुन्हे दाखल आहेत. यामधील लाचखोरीची रक्कम १ लाख ३८ हजार ५०० रुपये आहे. (वार्ताहर)