Pune: वैद्यकीय बिलात त्रुटी न काढण्यासाठी लाच घेणारा जाळ्यात; ससूनमधील वरिष्ठ लिपिकाला अटक
By विवेक भुसे | Published: August 10, 2023 08:19 PM2023-08-10T20:19:22+5:302023-08-10T20:20:10+5:30
ससून हॉस्पिटलमधील नवीन इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील अधीक्षक कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचण्यात आला होता....
पुणे : वैद्यकीय बिलात कोणतीही त्रुटी काढू नये, यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून अडीच हजार रुपये घेताना ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाला पकडण्यात आले. गणेश सुरेश गायकवाड (वय ४९) असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ससून हॉस्पिटलमधील नवीन इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील अधीक्षक कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचण्यात आला होता.
तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीकरीता ससून सर्वोपचार रुग्णालयात अधीक्षक कार्यालयात २१ जुलै रोजी सादर करण्यात आले होते. या वैद्यकीय बिलामध्ये त्रुटी न काढता फाईल पूर्ण करुन देण्याकरीता गणेश गायकवाड याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. ९ व १० ऑगस्ट रोजी त्याची पडताळणी करण्यात आली.
गणेश गायकवाड याने लाच मागितल्याचे पडताळणीत दिसून आल्यावर गुरुवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच स्वीकारताना गणेश गायकवाड याला पकडण्यात आले. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत.