लसीकरणासाठी लाच; एकास रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:16+5:302021-08-27T04:16:16+5:30
चाकण : येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी चारशे रुपये स्वीकारताना एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून ...
चाकण : येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी चारशे रुपये स्वीकारताना एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि.२६) दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
सचिन अरुण शिंदे (रा. रासे, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे. सचिन शिंदे हा येथील लसीकरण केंद्रावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम काही दिवसांपासून करीत होता. ४०० रुपयांची लाच घेताना अटक केलेला शिंदे हा ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काही दिवसांपूर्वी नेमणुकीस असल्याची बाब समोर आली आहे. सध्या तो चाकण ग्रामीण रुग्णालयात अधिकृतपणे नेमणुकीस होता का हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एका तक्रारदाराकडून चारशे रुपये स्वीकारताना शिंदे यास अटक करण्यात आली. चाकण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. या घटनेनंतर चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण दुपारनंतर बंद करण्यात आले आहे.