नवरीने आठ दिवसांत सोन्याचे दागिने घेऊन काढला पळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:58+5:302021-03-24T04:09:58+5:30
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: नितीन कांताराम कुरकुटे (रा.भराडी, ता.आंबेगाव) यांना लग्न करायचे असल्याने ते योग्य स्थळ शोधत होते. सुमारे ...
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: नितीन कांताराम कुरकुटे (रा.भराडी, ता.आंबेगाव) यांना लग्न करायचे असल्याने ते योग्य स्थळ शोधत होते. सुमारे दीड महिन्यापूर्वी नवनाथ महादेव गवारी (रा. गवारीमळा, मेंगडेवाडी, ता. आंबेगाव) याने शिंगणापूर (जि. परभणी) येथील एक स्थळ सुचवले. स्थळासाठी मध्यस्थ म्हणून दीड लाख रुपयांची मागणी गवारी यांनी केली होती.त्याप्रमाणे दीड लाख रुपये कुरकुटे यांनी रोख स्वरूपात दिले.यानंतर गवारी यांनी लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण (रा. शिंगणापूर) हे स्थळ दाखवले. त्यावेळेस त्या ठिकाणी नवनाथ महादेव गवारी व मुलगी, मुलीची मावशी कमल नामदेव जाधव,मामा महादेव लक्ष्मण चिंचवाड व काळे नावाचा इसम होता. सदर मुलीच्या नातेवाईकांनी आम्ही गरीब असल्याने लग्न करत आहोत.उद्याच्या उद्या लग्न करून घ्या असे सांगितले. मुलगी पसंत असल्याने नितीन कुरकुटे व त्याच्या घरातील लोक तसेच चुलते शिवाजी कुरकुटे त्यांनी लग्नाला होकार दिला.एका दिवसाच्या अंतराने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे घरासमोर भराडी येथे लग्न पार पडले. नवविवाहितेवर पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने कुरकुटे यांनी घातले.लग्न झाल्यानंतर नातेवाईक निघून गेले. विवाहित पत्नी सात दिवस घरी मुक्कामी राहिली.अचानक एके दिवशी सकाळी माझी मावशी कमल जाधव खूप आजारी आहे. मी शिंगणापूर येथे जाते. असे सांगून ही नवरी मुलगी माहेरी निघून गेली. जातेवेळेस पाच तोळे सोन्याचे दागिने अंगावर होते.आठ ते दहा दिवस झाले, तरी नवरी परत आली नाही म्हणून नितीन कुरकुटे यांनी शिंगणापूर येथे चौकशी केली.मात्र या वेळी धक्कादायक माहिती समोर आली.चार लोकांनी शिंगणापूर येथील घर हे एक दिवसासाठी भाड्याने घेतले होते. विवाहाचे निमित्त करून सोन्याचे दागिने घेऊन नवरी फरार झाली होती.यासंदर्भात पत्नी लक्ष्मी,कमल जाधव,महादेव चिंचवाड, काळे व मध्यस्थ नवनाथ गवारी यांना नितीन कुरकुटे याने संपर्क केला.मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.त्यांनी संगनमत करून लग्न करण्याचा खोटा बनाव केल्याप्रकरणी तसेच दीड लाख रुपये रोख व पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरनी नितीन कुरकुटे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली.
नवरी लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण, कमल नामदेव जाधव, महादेव लक्ष्मण चिंचवाड व काळे, मध्यस्थ नवनाथ महादेव गवारी यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित मडके करत आहेत. दरम्यान, बनावट लग्न लावून तरुणांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने मंचर पोलीस पुढील तपास करत आहे.