पुलांकडे पालिकेचा काणाडोळाच
By admin | Published: August 18, 2016 06:47 AM2016-08-18T06:47:30+5:302016-08-18T06:47:30+5:30
सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर महापौरांनी शहरातील सर्व पुलांचा स्ट्रक्चरल रिपोर्ट तयार करून तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश दिला. मात्र, त्याला आता दोन आठवडे
पुणे : सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर महापौरांनी शहरातील सर्व पुलांचा स्ट्रक्चरल रिपोर्ट तयार करून तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश दिला. मात्र, त्याला आता दोन आठवडे होऊन गेले तरीही अद्याप हा अहवाल महापौरांना मिळालेला नाही. शहरातील एकूण ३२ पूल, २१ उड्डाणपूल, ९ स्कायवॉक (पादचारी पूल) व २४ सब-वे (भुयारी मार्ग) प्रशासनाकडून असेच दुर्लक्षित झाले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसात भिडे पुलावर मोठी भेग पडली. तो डांबरी थराला गेलेला तडा आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच हिंगणे येथील पुलाच्या एका बाजूचा भराव खचला.
पुलाला धोका नाही, असे सांगत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. येरवडा येथील बंडगार्डन पुलाची अवस्था धोकादायक झाली होती. तो रहदारीला बंद करून पालिकेने तिथे आता वॉकिंग प्लाझा केला आहे. या पुलाच्या कठड्याचे काही दगडी खांब जागेवरच फिरलेले असून त्याची जुजबी दुरुस्ती करण्यात आली आहे.
शहरातील संभाजी पूल, शिवाजी पूल, वेलस्ली पूल या तीन पुलांचे बांधकाम ब्रिटिश अमलातील आहे. तत्कालीन बांधकामानुसार ते कमानी पद्धतीने केले आहे. अशा प्रकारच्या बांधकामांमध्ये कमानीत की-स्टोन असतो. तो थोडा जरी निखळला तरी अन्य दगडांनाही धोका असतो. सततच्या वाहतुकीने व वाहनांच्या वाढत्या संख्येने की स्टोन निखळण्याचा धोका वाढत असतो. तसे झाले नाही तर सपोर्ट करणारे खांब तरी जागेवरून फिरतात. बंडगार्डन पुलावर असेच झाले आहे. अन्य जुन्या पुलांची या दृष्टीने तपासणी होण्याची आवश्यकता आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी स्ट्रक्चरल कन्सलटन्सीचे काम करणाऱ्या एका खासगी संस्थेकडून शहरातील सर्व पुलांची अशी तपासणी करून घेतली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र त्याचा अहवाल उपलब्ध होत नाही.
संबंधित संस्थेकडून शहरातील एकाही पुलाला धोका नसल्याचा निर्वाळा दिला असल्याची माहिती दिली जाते. मात्र त्यांच्याच तपासणी अहवालाचा आधार घेत शहरातील सात पुलांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
अंदाजपत्रकात ७ कोटींची तरतूद
1 इंग्रजांनी बांधलेल्या संभाजी पूल, शिवाजी पूल, वेलस्ली पूल या तीन व राजाराम पूल, म्हात्रे पूल, बालगंधर्व पूल तसेच डेंगळे पूल या स्वातंत्र्योत्तर काळात बांधल्या
गेलेल्या ४ पुलांचा त्यात समावेश आहे. या पुलांच्या कामांसाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात तब्बल ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली असून, यातील डेंगळे पुलाचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले आहे.
2महापौरांनी आदेश दिल्यानंतर तरी शहरातील सर्व पुलांची पाहणी ते मजबूत आहेत किंवा नाहीत, या दृष्टिकोनातून होणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाने हा आदेश गंभीरपणे घेतलाच नाही, असे दिसते आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळपर्यंत तरी महापौरांना असा अहवाल मिळालेला नव्हता. अहवाल तयार असून त्याचे मराठीत भाषांतर सुरू आहे, असे महापौरांना सांगण्यात आले. मात्र त्या दुर्घटनेनंतर प्रत्यक्षात अशी पाहणी झालेलीच नसल्याचे बोलले जात आहे.
प्रशासन पुलांच्याबाबतीत पुरेसे गंभीर आहे. त्यामुळेच जुन्या पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. भिडे पूल किंवा हिंगणे पूल येथील घटना मोठ्या नव्हत्या. पुलांची शास्त्रीय तपासणी अलीकडेच एका संस्थेकडून करून घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल महापौरांना लवकरच सादर करू.
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता-प्रकल्प.
शहरात अनेक जुनी बांधकामे आहेत. तसेच नव्याने बांधलेले उड्डाणपूल, सब वे यांचीही नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. सुरक्षा महत्त्वाची आहे. दुर्घटना सांगून घडत नाही, मात्र म्हणूनच त्याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठीच पुलांची तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. अद्याप तरी मला हा अहवाल मिळालेला नाही. त्याबाबत चौकशी करीत आहे.- प्रशांत जगताप, महापौर