मळद कालव्यावरील पूल कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:07 AM2018-08-24T03:07:19+5:302018-08-24T03:07:38+5:30
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही
रावणगाव : मळद (ता. दौंड) परिसरातील शेलारवस्ती जवळील रेल्वे स्थानकानजीकचा खडकवासला कालव्यावरील साखळी क्र. १३० / ६०० हा पूल गुरुवारी ( दि. २३) सकाळी पाण्याच्या प्रवाहामुळे अचानक कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या पुलाबाबत ‘लोकमत’ने दि. २८ जुलै रोजी ‘मळद येथील कालव्यावरील पूल धोकादायक’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये मळद येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला होता. मळद गावातील मुख्य पूल दि. २६ एप्रिल २०१८ रोजी कोसळला आहे. त्यामुळे या पुलाचे काम सध्या सुरु आहे. परिणामी या पुलाचे काम चालू असल्यामुळे मळद ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी शेलारवस्तीवरील हाच एकमेव पूल वाहतुकीसाठी होता.
परंतु आता मात्र हा पूलदेखील कोसळल्याने कौठडी, जिरेगाव, शिर्सुफळ या गावांसह मळद येथील भंडलकरवस्ती, शेखवस्ती, शेलारवस्ती येथील ग्रामस्थांना गावात आणि शेतात जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
हा पूल कोसळल्यामुळे आता अनेक शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे रूळ ओलांडत आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागणार आहे.
तर ट्रॅक्टर बैलगाडी, मोटारसायकल आणि इतर चारचाकी वाहने गावात आणि शेतात कशी घेऊन जायची याची चिंता आता ग्रामस्थांना सताऊ लागली आहे.
मळद गावात एका वर्षात पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.