पुणे-नाशिक महामार्गावर मृत्यूचा पूल, राजगुरुनगर ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:30 AM2018-12-22T00:30:21+5:302018-12-22T00:31:05+5:30
पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत.
दावडी : पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे पुलाच्या डांबरीकरणावरून एखादा इंचही तुमची गाडी घसरली, तर ती थेट पंधरा-वीस फूट खोल ओढ्यात जाऊन पडणार आहे. त्यामुळे हा पूल म्हणजे जणू पुणे-नाशिक महामार्गावरून मृत्यूला जोडणाराच पूल झाला आहे.
पुणे-नाशिक महामार्ग हा राजगुरुनगर शहरातून जातो. राजगुरुनगरात येताच एका ओढ्यावर ब्रिटिशकालीन पूल लागतो. तो पूल ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात एक पूल बांधला होता. हा पूल सुरू होण्याआधी सुमारे शंभर मीटरवरून रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी रेलिंग लावण्यात आले होते. मात्र, कालांतराने या पुलाची व रेलिंगजी डागडुजी झालीच नाही.
त्यामुळे काही किरकोळ अपघातांत साईडचे लोखंडी रेलिंग तुटले आणि ते घसरत-घसरत थेट ओढ्यावर लोंबकळत आहे. इतकेच नव्हे, तर पुलाजवळील रस्ता खचून गेल्याने वाहने एक इंच जरी रस्त्यावरून खाली आल्यास थेट ओढ्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याची डागडुजी करण्याऐवजी मातीचा भराव टाकला आहे; त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी घसरडा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती आहे.
त्यामुळे हा पूल ओलांडताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. केवळ चारचाकीच नव्हे, तर दुचाकीस्वारांचा जीवही या धोकादायक पुलामुळे येथून जाणे अत्यंत कठीण झाले आहे.
अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता झाला अरुंद
पूल सुरू होण्याआधी रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे; मात्र त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. या रस्त्यावर दुतर्फा विविध दुकानांची गर्दी असल्यामुळे दुकानात खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेलाच वाहन पार्क करून दुकानात शॉपिंग करतात. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या पार्किंगमुळे पूल सुरू होण्याच्या आधीच रस्ता अरुंद होतो आणि वाहतुकीची कोंडी सुरू होते.
पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाची जशी अवस्था आहे, तशीच अवस्था येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगतच्या पुलाची झाली आहे. त्यामुळे येथील पूल आणि साईडचे रेलिंग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अशा आहेत त्रुटी
इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. रस्त्यावर कुठेही साईडला व मध्यभागी पांढरे पट्टे मारलेले नाहीत; त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या रुंदीचा आणि सेंटरपॉइंटचा अंदाज येत नाही.
रात्रीच्या वेळी तर रस्त्याची रुंदी कुठे संपते, याचा किंचितही अंदाज येत नाही. पूल सुरू झाल्यावर त्याच्या कठड्यांना रिफ्लेक्टरही लाण्यात आले नाहीत; त्यामुळे या पुलावरून वाहन चालविणे म्हणजे एक दिव्यच मानले जाते.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेक वेळा येथे वाहतूक जाम होते. वाहनांच्या कधीकधी रांगा लागतात; त्यामुळे काही वाहनचालक गाडी पुढे नेण्याच्या नादात डांबरी रस्त्यावरून खाली उतरतात व पूल जवळ आल्यावर मात्र तेथे माती खचली असल्याने पुलाजवळ येऊन फसतात.
येथे अनेक वेळा अपघात झाले. विशेषत: रात्रीच्या वेळी वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर तर नवख्या वाहनचालकांचा अपघात हा जणू ठरलेलाच आहे.