गजलमधून जीवनाचे संक्षिप्त रुप आशयात: रमण रणदिवे; गजलसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:51 PM2017-11-22T15:51:24+5:302017-11-22T15:55:26+5:30
गजलकार व संगीतकार विजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गजल समीक्षक डॉ. राम पंडित यांची प्रस्तावना आहे.
पुणे : गजल जीवनाचे संक्षिप्त रुप आशयातून मांडत असते. गजल जीवनानुभवाची सत्यता कलात्मक पद्धतीने उतरवलेला आशय असतो, असे मत ज्येष्ठ गजलकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केले.
गजलकार व संगीतकार विजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गजल समीक्षक डॉ. राम पंडित यांची प्रस्तावना आहे. यावेळी नवी मुंबईचे उपायुक्त आणि गजलकार कैलास गायकवाड, गजलकार अनंत नांदूरकर, जनार्दन म्हात्रे, बदीउज्जमा बिराजदार, प्रा. महादेव रोकडे, विशाल राजगुरु, राज अहेरराव, अनुराधा हवेलीकर, रिना वडवेराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रमण रणदिवे म्हणाले, ‘‘वडवेरावांच्या गजलेतील रचनेची सफाई आणि भावनेतील तरलता वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे गजल लेखन निर्दोष आहे. गजलकाराने स्वत:च्या गजलेला स्वत:च चाल लावून गायन करणे हा वेगळा प्रयोग आहे. त्यांचा हा प्रयोग गजल आणि संगीत क्षेत्रात वेगळी वाट पाडणारा आहे. गजलकार, संगीतकार आणि गजल गायक म्हणून वडवेराव आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतील.’’
कैलास गायकवाड म्हणाले, ‘‘अल्पावधीत गजल लेखनांवर प्रभुत्त्व मिळवण्याचा आणि वेगळी धाटणी निर्माण करण्याचा वडवेराव यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’
विजय वडवेराव म्हणाले, रोजच्या जगण्यातील अनुभव गजलेत उतरविले आहेत. माझी गजल समाजाच्या प्रत्येक घटकावर, तसेच प्रणय, प्रेमालाप यावर भाष्य करणारी आहे.
नरेंद्र गिरीधर यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन म्हात्रे यांनी आभार मानले.
वडवेरावांच्या ‘गजल बरसात’ने रसिक चिंब
पुस्तक प्रकाशनानंतर वडवेराव यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वरचित गजलांच्या ‘गजल बरसात’ या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना चिंब केले. विजय वडवेराव आणि गायिका स्मिता भद्रिके यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. रोहित वनकर (बासरी), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन), समर्थ काळोखे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), शास्त्रीय गायक शिवाजी चामनकर (संगीत संयोजन) यांनी साथसंगत केली.