सुमित्रा भावे यांचा अल्प परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:43+5:302021-04-20T04:10:43+5:30
सुमित्रा भावे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले खरे: पण सुरुवातीच्या काळात कला माध्यमाबद्दल त्यांना विशेष माहिती नव्हती. ...
सुमित्रा भावे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले खरे: पण सुरुवातीच्या काळात कला माध्यमाबद्दल त्यांना विशेष माहिती नव्हती. त्यांनी चित्रपट निर्मितीमधील सर्व अंगांचे ज्ञान आत्मसात केले. दिग्दर्शिका, पटकथा लेखिका, निर्माती या माध्यमांतून त्या चित्रपटाच्या ‘वन मॅन आर्मी’ झाल्या. टिपीकल लव्हस्टोरी, मसाला, मेलोड्रामा यापेक्षा चाकोरीबाहेरील सामाजिक संवेदनशील विषयांची पेरणी त्यांनी चित्रपटांमधून केली. सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. आगरकर हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. अनेक छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्तनिवेदनही केले. १९६५ सालापर्यंत त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यात त्यांनी विविध संस्थांवर काम केले. पुणे येथील कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये काही काळ त्यांनी शिकविण्याचे काम केले. स्त्री-वाणी संस्थेच्या संचालक पदावरही काम केले. समाजकार्य विषयात पीएच.डी.चे शिक्षण अपूर्ण राहिले असले, तरी पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. १९८५ मध्ये स्त्रीवाणीसाठी त्यांनी पहिला लघुपट तयार केला. त्यांनी 'बाई' या चित्रपटातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला होता. त्या चित्रपटाला विविध पुरस्कार मिळाले. या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९५ साली त्यांनी ‘दोघी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यावेळी त्यांना दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची चित्रपट निर्मितीत साथ मिळाली. या दोघांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, दहा राष्ट्रीय, चाळीस हून अधिक राज्य पुरस्कार आणि अन्य पुरस्कार मिळाले. या चित्रपटांचे देश- विदेशातील अनेक महोत्सवात प्रदर्शन झाले. संहितालेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सुमित्रा यांनी चित्रपटांमधून मानवी मन, नातेसंबंध आणि समाज यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . त्यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) संस्थेसाठी ‘माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणाऱ्या दूरदर्शन मालिकेची निर्मित केली. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. ‘दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या सहकार्याने त्यांनी मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आजारांवर देखील चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकत जनजागृतीचे काम केले. त्यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील चित्रपट दिग्दर्शन व निर्मितीच्या उत्तुंग व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१८ साली मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणेच्या वतीने मानाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय पुणे प्राईड पुरस्कार, शाहूमहाराज जीवनगौरव पुरस्काराच्या देखील त्या मानकरी ठरल्या आहेत.
--------------------------
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
अस्तु
एक कप च्या
कासव
घो मला असला हवा
जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
दहावी फ
देवराई
दोघी
नितळ
फिर जिंदगी (हिंदी लघुपट)
बाधा
बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)
मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)
वास्तुपुरुष
संहिता
हा भारत माझा
दिठी
------------------------------------------------------------------