‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:27+5:302021-08-14T04:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने सरकार मोफत गॅस कनेक्शन देऊनही गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना गॅस सिलिंडर भरणे कठीण झाले आहे.
चुलीच्या धुरापासून गरीब व सर्वसामान्य महिलांची सुटका व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४७ हजार ६६० कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांनादेखील यामध्ये गॅस सिलिंडर दिला. सुरुवातीला व कोरोना काळात या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले. परंतु गेल्या काही महिन्यांत गॅस सिलिंडरचे प्रचंड दर वाढल्याने, तब्बल घरात पोहोचलेली गॅस सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. यामुळेच या सर्व लाभार्थ्यांना पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
मे २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली व त्यानंतर एक-दोन वर्षांत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात यश आले. ही गॅस जोडणी दिल्यानंतर शासनाच्यावतीने सुरुवातीचे काही महिने लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर दिले. त्यानंतर मोफत गॅस सिलिंडर बंद झाल्यानंतर ६० टक्के लाभार्थी केवळ पाहुणे आले किंवा घाईच्या वेळीच गॅसचा वापर करत होते. आता उज्ज्वला गॅसचे बहुतेक सर्व लाभार्थी पुन्हा एकदा चुलीकडे वळाले आहेत.
--------
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी -१ लाख ४७ हजार ६६०
---------
असा गेला गॅस आवाक्याबाहेर (घरगुती गॅस सिलिंडरचे दर)
जानेवारी २०२० - ५६७
जुलै - २०२० - ५९४
जानेवारी -२०२१- ६९४
फेब्रुवारी - २०२१ - ७६९
ऑगस्ट - २०२१ - ८३७
----------
कोरोनामुळे सर्वच गोष्टी महागल्या आहेत. रोजचा घरखर्च करणे आवाक्याबाहेर गेले आहे. गॅस सिलिंडर तर ८३७ घरात पोहोचला आहे. एवढ्या महागाचा गॅस सिलिंडर घेऊन त्यावर शिजवण्यासाठी अन्नधान्य आणणे कठीण झाले असता गरिबाला गॅस कसा परवडेल.
- एक लाभार्थी
------
जिल्ह्यातील उज्ज्वल गॅसच्या तालुकानिहाय माहिती
आंबेगाव- ११,४६२, बारामती - १२,७३६, भोर - ५५२१, दौंड -११,२४५, हवेली - ३२,१४५, इंदापूर- २३२०६, जुन्नर- १४७४८, खेड -१०२५२, मावळ -५६५३, मुळशी -११४३, पुरंदर- ९०५०, शिरूर-९२५३, वेल्हा -१२४७, एकूण- १,४७,६६०
--------