चमचमत्या दिव्यांची झाली बरसात, लाईटच्या माळांना मागणी : प्रकाशसणाला आज प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:23 AM2017-10-16T03:23:25+5:302017-10-16T03:23:35+5:30
भारत हा सणांचा देश आहे. दरवर्षी अनेक सण येतात. त्यातील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, चैतन्याचा, आनंदाचा, समतेचा उत्सव, मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारत हा सणांचा देश आहे. दरवर्षी अनेक सण येतात. त्यातील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, चैतन्याचा, आनंदाचा, समतेचा उत्सव, मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे... या दिवसात घराबाहेर पणत्या, आकशकंदील लावले जातात, सगळीकडे प्रकाशच प्रकाश असतो. घराला आकर्षक लाइटिंगच्या माळांनी सजवले जाते. आता बाजारात विविध रंगीबेरंगी माळा उपलब्ध आहेत. दिवाळी जवळ आल्याने लाईटच्या माळांना मोठी मागणी आहे. शॉपिंग हा झगमगत्या महानगरी जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम आहे. याशिवाय कंदील, रोषणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो.
यंदा बाजारातील चिनी वस्तूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. बाजारपेठांमधील चिनी वस्तूंचे वर्चस्व कमी होत असल्याची माहिती अनेक व्यापाºयांनी दिली आहे. यंदाच्या दिवाळीत चिनी मालाची विक्री ५० टक्क्यांनी घटेल, असे व्यापाºयांनी सांगितले. चिनी वस्तूंच्या विक्रीबद्दल अनेक प्रश्न असल्याने व्यापाºयांनी यंदा चिनी वस्तूंची आॅर्डर कमी दिली आहे. यासोबतच जुना मालदेखील व्यापाºयांकडून स्वस्तात विकण्यात येतो आहे. पण आता चिनी माल बाजारात नाहीसा झालेला दिसून येतो. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी जय्यत तयारी सुरू असून, विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. एलईडीचा वापर करून तयार केलेले झुंबर, रंगीबेरंगी फुलांच्या विद्युत रोषणाई माळा, एलईडीचे मोर, वेल एलईडी क्रिस्टल, चक्र, लोट्स बल्ब, स्टार, अल्लाद्दीनचा चिराग, मिनी लॅम्स अशा विविध प्रकारच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एलईडीच्या समया, पणत्या, झालर लाइट, मल्टिकलर फोकस माळा, रोप विद्युत रोषणाई माळा वजनाने हलके आणि स्वस्त असल्याने अशा माळांना यंदा जास्त मागणी आहे. एलईडी फ्लॉवर पॉट, कारंजे, कंदील, लायटिंग बोर्डमधून क्षणाक्षणाला फुलणारे मनोवेधक आकार.. सजावट अधिक आकर्षक करण्यासाठीची विविध आकारांतील विद्युत रोषणाईच्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फुले, बदाम, डमरूच्या प्रकारांमधील एलईडी बल्बच्या रंगीबेरंगी माळा,
५० ते १०० बल्बच्या माळा, फ्रेडकलर, पारलाइट्स, झालर, मोर, चक्र यांसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंनी बाजारपेठ दिवाळीसाठी सजली आहे. यंदा भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असून, लायटिंग मार्केटमधील चिनी वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.