लोणावळा नगरपरिषदेला दलालांचा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 03:45 PM2017-09-27T15:45:25+5:302017-09-27T15:50:37+5:30
लोणावळा नगरपरिषद सध्या दलालांचा विळख्यात सापडली आहे.
लोणावळा- लोणावळा नगरपरिषद सध्या दलालांचा विळख्यात सापडली आहे. काही मंडळी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची नावे वापरुन बांधकाम साईटवर तसेच शहराच्या विविध भागात अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या याद्या घेऊन फिरत असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितिन आग्रवाल यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनीदेखील असे प्रकार शहरात सुरु असल्याचे माझ्यादेखील कानी आले असल्याचे सांगत संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सभागृहात सांगितले.
मुंबई पुणे या दोन शहरांच्या मध्यावर वसलेल्या लोणावळा व खंडाळा परिसरात नागरिकरण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या या शहरात अनेक नामवंत उद्योजक, सिने अभिनेते, अभिनेत्री, राजकारणी, सनदी अधिकारी व लक्ष्मीपुत्रांचे कोटीच्या कोटी रुपयांचे अलिशान बंगले आहेत. शेकडो हाॅटेल, सेकंड होम व अलिशान बंगलो स्किम आहेत. ना खाऊंगा ना खाणे दुगां असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर स्वतःची वेगळी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून काही अल्पसंतुष्ठ मंडळींचे बगलबच्चे पैशांसाठी शहरातील विविध भागांमधील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणांच्या याद्या खिशांमध्ये घेऊन बांधकाम साईटवर फिरत आहेत त्यांना अधिकार्यांची देखिल साथ आहे. या मंडळीचा नगरपरिषदेच्या विविध कार्यालयांमध्ये देखिल सतत वावर असल्याचे बोलले जात आहे. संबंधित मंडळी सोसायटी व बंगलेधारक, हॉटेल व्यावसायिक यांना अनाधिकृतच्या नावाखाली धमकावून ब्लॅकमेल करुन पैसे उकळत आहेत हे काळेधंदे करताना ते थेट नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या नावाचा वापर करत आहे याबाबत आपणास कल्पना आहे का असा प्रश्न नगरसेवकांकडून सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. याविषयी लोकमतशी बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या मी नागरिकांना आवाहन करते की आमच्या नावाचा वापर करुन जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, बांधकाम साईटवर फिरत असेल तर अशा मंडळींची नावासह थेट तक्रार दाखल करा. माझ्या कानावर देखिल संबंधित दलालीबाबत तक्रारी आल्या आहेत. मी त्यांची शहनिशा करुन कारवाई करणार आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसेच प्रशासनाने कोणी सांगतो म्हणून कोणाला टार्गेट करुन कारवाई करु नये. काही मंडळी राजकिय दबाव व अधिकार्यांसोबत असलेल्या अर्थपुर्ण संबंधांमुळे बांधकाम व्यावसायीकांना कलम 53 ची नोटीस बजावत बांधकाम पाडण्याची धमकी देत माया गोळा करत आहेत. ज्या कोणाला अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर नोटीसीची मुदत संपताच कारवाई करा लोकप्रतिनिधींसह कोणी जरी मध्ये आले तरी थांबू नका पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई पुर्ण करा अशी सक्त ताकिद जाधव यांनी प्रशासनाला दिली आहे.
दलालांच्या वाढत्या भानगडींमुळे सध्या लोणावळा नगरपरिषदेच्या कारभारावर शितोंडे उडविले जाऊ लागले आहेत. अगदी काही लोकप्रतिनिधींपासून अधिकार्यांचे या दलालांशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. जर या मंडळींचा कोणाशी संबंध नाही तर त्यांच्याकडे शहरातील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे यांच्या याद्या गेल्या कशा, ते कोणाच्या सांगण्यावरुन खुलेआम बांधकाम साईटवर जातात असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले गेल्याने दलालांचा थेट संबंध नगरपरिषद कार्यालयाशी असल्याचे बोलले जात आहे.
रात्री अपरात्री अतिक्रमण कारवाई
लोणावळ्यात सध्या नगरपरिषदेचा एक कर्मचारी खुलेआम हातगाडी व पथारीधारकांना त्रास देऊन हप्ते गोळा करत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. रात्री अपरात्री शहरात फिरुन हातगाडी धारकांवर अधिकार नसताना कारवाई करणे, सण उत्सवानिमित्त हारफुल विक्रीचा व्यावसाय करणार्यांना दमदाटी करुन हाकलून लावणे, आठवडे बाजारात जाऊन भाजीपाला विक्रेते व पथारी व्यावसायकांकडून पैसे उकळणे असे प्रकार सुरु आहेत. वरिष्ठ अधिकारी मात्र आपण कोणालाच असे आदेश दिले नसल्याचे सांगत असल्याने हे महाशय कोणाच्या सांगण्यावरुन व्यावसायकांना त्रास देत आहे याबाबत उलटसुलट चर्चा असून वरिष्ठांनी या कर्मचार्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरातून होऊ लागली आहे. स्थानिक तरुणांकडून हप्ते मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणारा हा कर्मचारी परप्रांतीयांकडून हप्ते घेऊन त्यांना मात्र व्यावसायाला सुट देत आहे.