तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:23 PM2019-03-15T15:23:47+5:302019-03-15T15:30:47+5:30
मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...
पुणे : तोट्यात चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या उत्पन्नांत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्येच आता वाहक व चालकांना एका मार्गावरून तीन दिवसांत किमान चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. हे टार्गेट पूर्ण न केल्यास त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात येणार आहे.
मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तिकीट विक्रीतून पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रशासनाने सर्वच मार्गांवरून उत्पन्न मिळविण्याचे टार्गेट वाहक व चालकांना दिले आहे. वाहतुक व्यवस्थापकांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. वाहक व चालकांना एकाच मार्गावर फिक्स ड्युटी दिली जाते. त्यांनी प्रत्येक शिफ्टमध्ये तीन दिवसांत संबंधित मार्गावर सरासरी ४ हजार रुपयांचे उत्पन्न आणावे, असे टार्गेट देण्यात आले आहे.
जे वाहक, चालक टार्गेट पुर्ण करणार नाहीत, त्यांची बदली केली जाणार आहे. त्यांची फिक्स ड्युटी रद्द करून पुन्हा त्या मार्गावर पाठविले जाणार नाही. त्यांना नियमित रोटेशन शिफ्टप्रमाणे काम करावे लागणार आहे. आगार व्यवस्थापकांकडून फिक्स ड्युटी असलेल्या चालक व वाहकांचे दररोजचे उत्पन्न तपासणीच्या सुचना वाहतुक व्यवस्थापकांनी दिल्या आहेत. उत्पन्न कमी आणल्यास त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर रोजच्या रोज कारवाई करण्यात यावी, अशी तंबी देण्यात आली आहे. दरम्यान, वाहतुक व्यवस्थापकांच्या परिपत्रकानंतर वाहक व चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज संबंधित मार्गावर मिळणारे उत्पन्न निश्चित नसते. त्यामुळे टार्गेट ठरवून देणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. तर काही कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याने ही कारवाई केली जाणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. यामध्ये केवळ संबंधित कर्मचाऱ्यांची ड्युटी बदली जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.