ऑनलाइन लिलाव करणार असाल तरच डाळिंब व्रिकीसाठी आणा : बाजार समितीचा अजब फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:00 PM2019-09-07T13:00:24+5:302019-09-07T13:06:03+5:30
ऑनलाईन लिलावाच्या तुलनेत पारंपरिक तोंडी लिलाव पद्धतीत भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेस विरोध दर्शविला.
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डमधील फळ विभागात ई-नाम अंतर्गत डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या सोमवार, मगंळवारी पुणे बाजार समितीला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तातडीने बुधवारपासून डाळिंब यार्डात ई-नाम अंतर्गत ऑनलाइन लिलाव सुरू केले. परंतु ऑनलाइन लिलावापेक्षा पारंपरिक लिलाव पद्धतीने डाळिंबाला अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या ऑनलाइन लिलाल पद्धतीला शुक्रवारी विरोध केला. यामुळे डाळिंब यार्डात चांगलाच गोंधळ उडाला. यावर बाजार समितीने डाळिंबाचा ऑनलाइन लिलाव करायचा असेल तरच डाळिंब येथे विक्रीसाठी आणा असा अजब फतवा काढला. यामुळे शेतकरी वर्ग चांगला संतप्त झाला आहे. केंद्र शासनाने सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली लागू केली आहे. पुणे बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आणि डाळिंब हा १०० टक्के शेतीमाल हा शेतकऱ्यांचा असल्याने या शेतीमालाचा लिलाव ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) करण्याच्या सूचना पणनसंचालकांनी यापूर्वीच बाजार समितीला दिल्या होत्या. त्यानुसार पुणे बाजार समितीने डाळिंबासह कांदा, बटाट्याचा समावेश केला असून पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लिलावासाठी डाळिंबाची निवड केली आहे. तर, यापूर्वी बाजार समितीत गुळाचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ईनाम योजनेनुसार मागील काही दिवसांत डाळिंब आडत्यांना ऑनलाइन लिलावाबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यावर सुरुवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यावरही बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसण केले होते.
..........
ईनाम अंतर्गत डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवार (दि.९) आणि मंगळवार (दि.१०) रोजी पुणे बाजार समितीला भेट देणार आहे. यामुळे बुधवार (दि.४) पासून डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, ऑनलाईन लिलावाच्या तुलनेत पारंपरिक तोंडी लिलाव पद्धतीत भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेस विरोध दर्शविला.
त्यामुळे शुक्रवारी डाळिंब यार्डात गोंधळ निर्माण झाला. त्यावर बाजार समितीने शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्याऐवजी डाळिंबाची विक्री ऑनलाइन लिलावाने करायची असल्यास बाजारात डाळिंब आणावे अन्यथा डाळिंब विक्रीसाठी आणू नये, असा फतवा काढला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. आता केंद्रीय पथकापुढे ऑनलाइन लिलावाचे काय होणार हे पाहणे जरूरीचे आहे. याबाबत समितीचे सचिव बी. जे. देशमुख म्हणाले, बाजार आवारात ईनाम योजनेअंतर्गत डाळिंबाची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे.