मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:00 IST2025-03-29T19:59:45+5:302025-03-29T20:00:14+5:30
भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन सुटल्याने त्याच्यावर महिलेचा विश्वास बसला होता

मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा
पुणे : त्याच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन सुटल्याने त्याच्यावर महिलेचा विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने घरावर संकट येणार आहे, असे सांगून मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या. या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट टळेल, असे सांगितले. महिलेला हडपसर भाजी मंडईजवळ बोलवले. नजर चुकवून ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन हा बाबा म्हणवणारा पसार झाला. हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने काही तासात या भोंदू बाबाला अटक केली आहे. निलकंठ सूर्यवंशी (३५, रा. कनेरसर, ता. खेड, सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत फुरसुंगी येथील एका ४४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील भाजी मंडईतील एका रसवंतीगृहाजवळ २७ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दोन वर्षांपूर्वी कनेरसर येथे फिर्यादी आपल्या पतीला घेऊन गेल्या होत्या. यमाई देवी मंदिराजवळ ते निलकंठ सूर्यवंशी यांना भेटले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादींच्या पतीने काही दिवस दारु पिणे सोडून दिले होते. त्यामुळे या महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. हा बाबा महिने दोन महिन्यातून कॉल करुन कौटुंबिक समस्यांमध्ये मार्गदर्शन करत असे. त्याबदल्यात फिर्यादी महिला पाचशे ते हजार रुपये दक्षिणा म्हणून पाठवत असत.
फिर्यादी महिलेला २५ मार्च रोजी निलकंठ सूर्यवंशी याचा फोन आला. त्याने सांगितले की, तुमच्या घरावर संकट आहे. त्यावर त्यांनी निलकंठ याला यावर काय उपाय आहे, असे विचारले. त्याने मी येतो मग बोलू असे सांगितले. त्यानंतर २७ मार्च रोजी त्याचा फोन आला, तुम्ही तुमचे मंगळसुत्र, दागिने व मुलीची चैन घेऊन या. मी या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट टळेल, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने फिर्यादी दागिने घेऊन दुपारी दीड वाजता हडपसर भाजी मंडईजवळ आल्या. त्यांची निलकंठ सूर्यवंशी याच्याशी भेट झाली.
उसाचा रस पिल्यानंतर त्याने दागिने मागितले. महिलेने दागिने असलेली प्लास्टिकची पिशवी त्याच्या हातात दिली. तो पिशवीत हात घालून काहीतरी पुटपुटत होता. त्यानंतर त्याने या महिलेला लिंबू दिले, व पुढे जाण्यास सांगितले. थोडे चालल्यानंतर लिंबू खाली टाकून मी दागिने देईन. ते तुम्ही घाला. मी तुमच्या मागे येतो, असे सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या थोडे पुढे गेल्या. लिंबू खाली टाकले. दागिने घेण्यासाठी मागे वळल्या असता त्यांना सूर्यवंशी तेथे दिसला नाही. त्यांनी आजू बाजूला शोध घेतला तरी तो दिसला नाही. तो सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसुत्र, सोन्याची चैन असे ६८ ग्रॅम वजनाचे ३ लाख ४० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला होता.
महिलेने लगेचच हडपसर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर लगेचच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हसन मुलानी व त्यांच्या सहकार्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन निलकंठ सूर्यवंशी याचा माग काढून त्याला अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.