‘स्मार्ट’ सहकार्यासाठी ब्रिटन उत्सुक
By admin | Published: November 11, 2016 02:13 AM2016-11-11T02:13:14+5:302016-11-11T02:13:14+5:30
देशातील महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये योगदान देण्यासाठी ब्रिटिश सरकार
पुणे : देशातील महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये योगदान देण्यासाठी ब्रिटिश सरकार व कंपन्या उत्सुक असल्याचे ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव लियाम फॉक्स यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने शहरातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत चाललेल्या कामांची पाहणी केली. या वेळी ब्रिटनचे उपउच्चायुक्त कुमार अय्यर, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, संगणक
विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते.
शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यासाठी शहराच्या काय गरजा आहेत याची माहिती ब्रिटनच्या शिष्टमंडळाने जाणून घेतली. शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे सादरणीकरण या वेळी करण्यात आले. शहरामध्ये वाहतूक प्रश्न, २४ तास पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी कामांसाठी कोणते तंत्रज्ञान हवे आहे याची सविस्तर चर्चा या वेळी करण्यात आली. ब्रिटनकडून काय मदत होऊ शकते याची माहिती लियाम फॉक्स यांनी दिली. पुणे व ब्रिटनमध्ये लवकरच याबाबत सहकार्याचा करार होईल असा विश्वास फॉक्स यांनी व्यक्त केला. बुधवार व गुरुवार हे शिष्टमंडळ पुण्यात होते. यानंतर कोची या शहराला शिष्टमंडळ भेट देणार आहे.
(प्रतिनिधी)