महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला पडल्या भेगा, अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:09 AM2018-01-02T03:09:59+5:302018-01-02T03:10:10+5:30
पाथरगावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाने शंभरी ओलांडून २१ वर्षे झाली आहेत. या पुलाचे वय १२१ वर्र्षे झाले असून, या पुलाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाच्या भिंतींवर झाडे उगवली असून, त्यामुळे भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत.
कामशेत : पाथरगावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाने शंभरी ओलांडून २१ वर्षे झाली आहेत. या पुलाचे वय १२१ वर्र्षे झाले असून, या पुलाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाच्या भिंतींवर झाडे उगवली असून, त्यामुळे भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत.
पाथरगावाच्या हद्दीत ताजे-पिंपळोली फाट्याजवळील लोहमार्ग व इंद्रायणी नदीवरील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दोन लेनसाठी चार पूल असून, यातील दोन पूल लोहमार्ग व दोन पूल इंद्रायणी नदीवर आहेत. मुंबई-पुणे या लेनवरील दोन पूल नवीन आहेत. तर पुणे-मुंबई लेनवरील दोन पूल खूपच जुने आहेत. या पुलांनी शंभरी पार केली असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. यातील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या भिंतीवर १८९६मध्ये पूल बांधल्याची नोंद आहे. राहिलेले दोन पूल हे महामार्गाच्या दोन लेन सुरू होताना काही वर्षांपूर्वी बांधले असल्याचे समजते. दोन्ही पूल हे एकमेकांना समांतर आहेत. या पुलांवरून पुण्याकडे जाणारी व जुन्या पुलावरून मुंबईकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू असून, रात्रंदिवस या पुलांवरून हजारो वाहने ये-जा करीत असतात.
पाथरगावच्या हद्दीतील खिंड, ताजे पिंपळोली गावाकडे जाणारा फाटा, तीव्र वळण, चढ व उतार यामुळे हे अपघातप्रवण क्षेत्र असून, येथे होणाºया अपघातांचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय जुन्या पुलांच्या सुरुवातीला ताजे-पिंपळोली फाटा येथे गावातून महामार्गावर येणाºया रस्त्यावर तीव्र चढण असल्याने समोरील महामार्गावरील वाहनाचा अंदाज येत नाही. रस्ता ओलांडताना अनेक ग्रामस्थांचे हकनाक बळी गेले आहेत. तर पाथरगाव खिंडीतून पुढे तीव्र उतार व तीव्र वळण असल्याने वेगात येणाºया अनेक वाहनचालकांना अंदाज न आल्याने वाहने पुलाच्या अलीकडील बाजूस खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी वाहने अपघात होऊन रस्त्याच्या खाली पडतात. मात्र, अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून दिसत नसल्याने अनेक अपघातग्रस्तांचे उपचाराअभावी मृत्यू झाले आहेत. वारंवार होणाºया अपघातांमुळे पुलाच्या कठड्यांची पडझड होत असते. इंद्रायणी नदीवरील हा पूल बांधून अनेक वर्षे उलटल्याने पूल जीर्ण झाला आहे.
संरक्षक कठड्यांची ग्रामस्थांची मागणी
मावळ परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असून, पावसाचा जोर वाढल्यास कमी दिवसांतच इंद्रायणी नदीला पूर येण्याच्या घटना घडत असतात. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असून, जुन्या पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी पुलाच्या मोºयांवर येते. जीर्ण झालेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाच्या सुरुवातीला ताजे पिंपळोली फाट्यापर्यंत संरक्षक कठडे बांधावेत, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.