ब्रिटीश मातेने दुग्धदानातून जोडले मातृत्वाचे नाते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 08:29 PM2019-11-12T20:29:06+5:302019-11-12T20:30:19+5:30
ससून रुग्णालयात २०१३ मध्ये मातृत्व दुग्ध पिढी स्थापन करण्यात आली...
पुणे : अमेरिकेतील एका सॉफ्टवेयर इंजिनीअर मातेने दहा दिवसांच्या काळात पुण्यात वास्तव्यास असताना ससून रुग्णालयाच्या मातृदुग्ध पेढीत चक्क सात लिटर दूध दान केले आहे. दुग्धदानातून तिने ससून रुग्णालयाशी मातृत्वाचे एक अनोखे नाते जोडले आहे.
ससून रुग्णालयात २०१३ मध्ये मातृत्व दुग्ध पिढी स्थापन करण्यात आली. या पिढीमधून वार्षिक सरासरी ३ हजार ४५० मातांकडून दुग्धदान करण्यात आले. ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या ३ हजार ९६३ नवजात शिशूंना लाभ होतो आहे. यामुळे नवजात शिशुचा मृत्यू दर कमी होण्यास मदत झाली. तसेच पावडर मिल्कचा वापर देखील कमी झाला. त्यामुळे ससूनच्या मातृदुग्ध पिढीचा सध्या मोठा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अमेरिकेतील एक सॉफ्टवेयर इंजिनीअर महिला नुकतीच बाळंत झाली होती. कामानिमित्ताने ती भारतात येणार होती. तिने देशात येण्यापूर्वी पुण्यातील मिल्क बँकची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना ससून रुग्णालयातील मिल्क बँकची माहिती मिळाली. त्यावेळी पेढीशी संपर्क त्यांनी साधला आणि दुग्ध दान करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने दहा दिवसांमध्ये सात लिटर दूध दान केले. या मातृदुग्ध पेढीला ब्रिटीश मेडीकल जर्नल (बीएमजे) यांच्याद्वारे 'मॅटर्नल अँन्ड चाईल्ड हेल्थ टीम ऑफ द ईअर २०१७' या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आतापर्यत या पेढीने सरासरी प्रतिवर्षी ४१५ लिटर दूध संकलन केले आहे. आॅगस्ट २०१६ पासून मातृदुग्ध संकलन वाहन सुरू करण्यात आले आहे. प्रतिवर्षी ६५ लिटर दूध संकलित केले आहे. बालरोग विभागातील बाह्यरुग्ण विभागात कक्ष बनवून तेथे लसीकरणांसाठी येणाºया बाळांना प्रतिवर्षी २१ लिटर दूध संकलित करण्यात यश आले. या दुग्धपेढीचा गेल्या दोन वर्षांपासून सोफोश या अनाथ संस्थेतील बालकांना लाभ होत आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, मातृदुग्धपेढीच्या यशस्वी वाटचालीमुळे येथे आता 'मातृदुग्ध शोधशाळा' बालरोग चिकित्साशास्त्र विभागामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्याचा सर्वांना फायदा होईल.