खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:38 PM2021-04-01T21:38:39+5:302021-04-01T21:40:34+5:30
१३ मार्च रोजी सागरने तिला गोड बोलत बाहेर घेऊन गेला होता. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही.
येरवडा : मनिषा व सागर यांचे दहा वर्षापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. सागर वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र तरुणीचे अपहरण करून डोक्यात दगड घालून तिचा भाटघर धरणाच्या परिसरात निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सागर गुंडव (वय 32 रा. चांदुरबाजार, अमरावती) याला अटक केली आहे. या घटनेत मनीषा बापूराव गेडाम (वय 29, सध्या रा. विजय कारगिल नगर वडगाव,मूळ- चांदूर बाजार,अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आली होती. वडगावशेरी येथील एका ती मैत्रिणीसोबत राहत होती. सागरने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी बाहेर घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. याप्रकरणी तिच्या भावाने चंदननगर पोलीस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. १० वर्षांपासून असलेले संबंध तोडल्यानंतर सागरने अमरावती येथील मनिषाच्या घरी जाऊन तोडफोड व नासधुस केली होती.
या प्रकरणी तिच्या मूळ गावी चांदूरबाजार येथे अमरावती पोलिसांनी केलेल्या तपासात मनीषाच्या काही वस्तू सापडल्या होत्या. मात्र तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या तक्रारी वरून चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
सागर याने तिला भाटघर धरणाच्या परिसरात निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. गुन्हा करून तो अमरावती येथे गेला होता. चंदन नगर पोलिसांनी अमरावती येथून त्याला ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने अपहरण व खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी सागर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी पोलिसांना मनिषाच्या शरीराचा सांगाडा व काही वस्तू मिळाल्या आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, चंदन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे सुनील थोपटे पुढील तपास करीत आहेत.