पाण्याच्या प्रवाहाने तुटला पूल
By admin | Published: October 15, 2015 01:06 AM2015-10-15T01:06:28+5:302015-10-15T01:06:28+5:30
५० हून अधिक वर्षांपूर्वीचा होलेवस्तीतील जुना पूल पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात तुटला आहे. अतिवेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रात्रीच्या वेळी पूल तुटल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
हडपसर : ५० हून अधिक वर्षांपूर्वीचा होलेवस्तीतील जुना पूल पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात तुटला आहे. अतिवेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रात्रीच्या वेळी पूल तुटल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
महापालिका व पुणे कॅन्टोंमेन्ट हद्दीचे विभाजन या नाल्यामुळे होते. या नाल्यावर एकूण आठ पूल आहेत. यापैकी चार पूल पूर्णपणे खचलेले आहेत. मध्यंतरीच्या काळात या पुलाच्या ठिकाणी तसेच पुलाकडेने रात्री-अपरात्री कचरा व राडारोडा टाकण्यात येत होता. यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला होता. याबाबत होलेवस्ती परिसरातील नागरिकांनी वारंवार महापालिका व कॅन्टोंमेन्ट कार्यालयाचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांना कळविले होते; मात्र उपयोग झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पूर्वी दरवर्षी पालिकेच्या वतीने नाल्याची साफसफाई करण्यात येत होती. मात्र, गेल्या चार वर्षांत साफसफाईअभावी या नाल्यामध्ये ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्या, काटेरी झुडपे, जुने पुराने कपडे, टाकाऊ फर्निचर व ओला कचरा साठल्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे.
तुटलेला पूल जेसीबीने पूर्णपणे काढून टाकावा, नाल्यातील साठलेला राडारोडा उचलावा व भिंत बांधून आठवड्यातून एकदा औषधफवारणी करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)