तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 02:01 AM2019-01-20T02:01:25+5:302019-01-20T02:03:33+5:30
‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात शनिवारी कास्यंपदक मिळवून दिले.
पुणे : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात शनिवारी कास्यंपदक मिळवून दिले. कांस्यपदकाच्या प्ले आॅफ लढतीत त्याने राजस्थानच्या जगदीश चौधरी याचा ६-२ असा सहज पराभव केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या ३ तिरंदाजांना सुवर्णपदकाची संधी आहे. यामध्ये कम्पाउंड प्रकारात १७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रथमेश जावकर, मुलींच्या गटात ईशा पवार, तर २१ वर्षांखालील गटात रिकर्व्ह प्रकारात साक्षी शितोळे यांनी अंतिम फेरी गाठली.
कम्पाउंड प्रकारातील २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या सौमित्र घोष याला हरियाणाच्या सुमीतकुमारकडून १४२-१४० असा २ गुणांनी पराभव पत्करावा लागला. १७ वर्षांखालील मुलींच्या रिकर्व्हच्या कास्यंपदकाच्या प्ले आॅफ लढतीत बिशाल चांगमणी हिला राजस्थानच्या कर्णीसिंग हिचे आव्हान पेलवले नाही. कर्णीने निर्विवाद वर्चस्व राखताना बिशाल हिचा ६-० असा पराभव केला.
>व्हॉलिबॉलमध्ये सुवर्णपदकाची संधी
सांघिक खेळांमध्ये महाराष्ट्राची निराशाजनक कामगिरी सुरू असतानाच व्हॉलिबॉलपटूंनी शनिवारी काहीसा दिलासा दिला. १७ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलिबॉल संघाने अंतिम फेरीत धडक देताना सुवर्णपदकाच्या आशा जागविल्या आहेत.
महाराष्ट्र संघाने उत्कंठापूर्ण लढतीत केरळचा ३-२ अशा सेट्सने पराभव केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राची गाठ पश्चिम बंगाल सोबत पडणार आहे.
२१ वर्षांखालील मुलीच्या गटात मात्र कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला. पश्चिम बंगालने यजमान संघावर २५-६, २५-२०, २५-१९ अशा फरकाने सहजपणे सरशी साधली.
बास्केटबॉलमध्ये कांस्यपदक हुकले
रोमहर्षक लढतीत शेवटच्या पाच मिनिटांत अचूकतेअभावी महाराष्ट्राला १७ वर्षांखालील मुली तसेच २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. १७ वर्षांखालील गटात त्यांना केरळने ७९-६८ असे हरविले. २१ वर्षांखालील मुलांमध्ये हा संघ केरळकडूनच ७९-७३ अशा फरकाने पराभूत झाला.