बहिणीच्या दशक्रियादिवशीच भावाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:36+5:302021-05-30T04:10:36+5:30
--- अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येेथे कोरोनाच्या संसर्गाने अकरा दिवसांपूर्वीच निधन झालेल्या मुलीचा दशक्रियेच्या दिवशीच तिच्या भावाचाही ...
---
अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येेथे कोरोनाच्या संसर्गाने अकरा दिवसांपूर्वीच निधन झालेल्या मुलीचा दशक्रियेच्या दिवशीच तिच्या भावाचाही कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या दहा दिवसांतच ऐन तिशीतील बहीण-भावांना काळाने हेरल्याने अवघा गाव शोकाकुल झाला.
माधवी बाळासाहेब हिंगे-पाटील (३१) आणि मयूर बाळासाहेब हिंगे पाटील (२९) असे मृत्यू पावलेल्या बहीण-भावांची नावे आहेत.
माधवी आणि मयूर या दोघांसह त्यांच्या आईवडिलांनाही पंधरा दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. घरातील चौघेही पॉझिटिव्ह आले असले, तरी तुलनेने माधवी व मयूर यांना कोरोनाचा अधिक त्रास व्हायला लागला. आईवडील हे कोरोनातून बरे झाले, मात्र माधवी व मयूर यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. उपचार सुरू असतानाच माधवीचा १४ मे रोजी मृत्यू झाला. त्यावेळी मयूरवर रुग्णालयात उपचार सुरू होते. माधवीच्या जाण्याचा दु:खाच्या डोंगरातून आईवडील आणखी सावरलेही नव्हते, तिचा दशक्रियाही झाली नाही तोपर्यंत दशक्रियेच्या दिवशीच माधवीचा छोटा भाऊ मयूर याचाही कोरोनाने मृत्यू झाला.
माधवीचे डीएडपर्यंतचे शिक्षण झाले होते, शिवाय ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राची ती पदवीधर होती. मयूर हा संगणक अभियंता होता. त्यांचे आईवडील हे शेती करत असून आई पंचायत समिती आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहे. दहा दिवसांत दोन्ही तरुण मुलांवर काळाने झडप घातल्याने आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पाटील कुटुंबीयांवरील या दु:खद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
--
फोटो क्रमांक : २९ अवसरी बुद्रूक बहीण-भावाचा मृत्यू
छायाचित्रा : खालील मजकूर माधुरी हिंगे पाटील व मयुर हिंगे पाटील यांचा फोटो मेल केला आहे