Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 05:26 PM2024-09-01T17:26:40+5:302024-09-01T17:27:18+5:30

भाऊ अन् वहिनीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे केले

Brother and sister in law became 48 year old Sakina was brutally killed Inside story of crime in Pune | Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी

Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी

किरण शिंदे 

पुणे : ४८ वर्षाच्या सकिना खान.. भाऊ अश्फाक खान आणि वहिनी हमीदा खान यांच्यासोबत पुण्यातील पाटील इस्टेट वसाहतीत राहायच्या.. 23 ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांचा खून झाला.. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करण्यात आले.. आणि त्यांचा मृतदेह मुळा-मुठा नदीपात्रात फेकून देण्यात आला.. ३ दिवसानंतर त्यांच्या मृतदेहाचे काही अवशेष खराडी परिसरातील नदीपात्रात सापडले आणि एकच खळबळ उडाली.. गुन्हा दाखल झाला.. ओळख पटवण्याचं काम सुरू झालं.. आणि त्यानंतर ५ दिवसांनी धक्कादायक माहिती उघडकीस आली.. ती म्हणजे सकीना खान यांचा खून त्यांच्या सख्या भावानेच केला.. नेमकं काय झालं? सकीना यांचा खून कशासाठी केला? मृतदेहाचे तुकडे तुकडे कशासाठी केले? वाचा या सविस्तर बातमीत..

शिवाजीनगरातल्या पाटील इस्टेट वसाहतीत सकीना खान दहा बाय दहाच्या छोट्या घरात राहायच्या. आई-वडिलांनी हे घर सकीनाच्या नावावर केलं होतं. आणि याच घरात सकिना यांचा भाऊ अश्फाक आणि वहिनी हमीदा हे देखील राहायचे. मात्र मागील काही दिवसांपासून भावाबहिणीत वाद सुरू होते. हा वाद होता प्रॉपर्टीसाठी. सकीना राहत असलेलं घर आपल्या नावावर करून द्यावं यासाठी अशपाक मागे लागला होता. मात्र सकीना त्याला दाद देत नव्हती. आणि यावरून त्यांच्यात भांडण व्हायचं. 23 ऑगस्टच्या रात्री देखील तेच झालं. सकीना, अश्फाक आणि हमिदा यांच्यात जोरदार भांडण झालं. यावेळी अश्फाकने रागाच्या भरात दोरीने गळा आवळून सकीनाचा खून केला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर आपल्या हातून मोठा अपराध झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने जे केलं ते अतिशय भयंकर होतं.

हमिदा आणि अश्फाकणे मरून पडलेल्या सकिनाचा मृतदेह ओढतच घरातल्या छोट्याशा बाथरूममध्ये नेला. आणि अक्षरशः कोयत्याने मृतदेहाचे तुकडे केले.. डोकं वेगळं केलं, दोन्ही हात, दोन्ही पाय वेगळे केले. त्यानंतर हे सर्व अवयव एका पोत्यात भरून घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळा मुठा नदीच्या पात्रात फेकून दिले. त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात हे दोघे पती-पत्नी वावरत होते. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून सकीना बाहेरगावी गेल्याचेही त्यांनी सांगून टाकलं होतं. आणि नेहमीप्रमाणेच त्यांचा दिनक्रम सुरू होता.

26 ऑगस्टचा दिवस उजाडला. खराडी परिसरातल्या मुळामुठा नदीपात्रालगत काही कामगार काम करत होते. इतक्यात त्यांना नदीच्या काठावर हात पाय आणि मुंडकं नसलेलं एका महिलेचे धड पाण्यावर तरंगत असताना दिसलं. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासला सुरुवात झाली. सुरुवातीला पोलिसांनी याच नदीपात्रात या मृतदेहाचे आणखी काही अवयव सापडतात का हे पाहण्यासाठी ड्रोनची मदत घेतली. मात्र त्यांना कुठलाही पुरावा सापडत नव्हता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या महिलेविषयी माहिती देणाऱ्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होते. 

इकडे सकीना खान बेपत्ता असल्याने पाटील इस्टेट वसाहतीत कुजबूज वाढली होती. शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. मामी कुठेच दिसत नसल्याचं पाहून सकीना खान यांच्या भाचीने त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आणि त्यानंतर अवघ्या काही तासात या  खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी सकीनाचा भाऊ आणि वहिनी यांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनीही खुनाची कबूल केली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. सध्या हे दोघेही पोलीस कोठडीत आहे. सकीना खान यांच्या मृतदेहाच्या उर्वरित अवयवांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. मात्र सख्या भावानेच, छोट्याशा प्रॉपर्टी पायी. सख्ख्या बहिणीचा खून केल्याचं उघडकीस आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली.

Web Title: Brother and sister in law became 48 year old Sakina was brutally killed Inside story of crime in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.