अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:55 PM2022-03-10T18:55:41+5:302022-03-10T18:55:55+5:30

खडतर प्रवासातून अखेर पीएसआय होऊन तिने आई वडिलांचे स्वप्न साकार केले

Brother death in an accident grief over family daughter becomes PSI after waiting for struggles in baramati | अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय'

अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय'

Next

सांगवी (बारामती) : जीवनात ध्येय गाठत असताना या प्रवासात खुप अडचणी येतात. पण निराश न होता ठामपणे लढायचं असतं. जर संघर्षाशी दोन हात केले तर यश हे मिळतच. प्रत्येकाला यश मिळतच असं नाही. परंतु काही आशावादी, ध्येयवादी व सक्षम सकारात्मक असे अनेक उमेदवार आहेत की जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण करतात.

पहिल्याच प्रयत्नात कृषी सहायक पदवीचे यश मिळवणारी ती होती. आपण एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. ध्येय वेगळे होते. मग काय पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
 
सर्वसामान्य शेतकरी असणाऱ्या कदम दांपत्याचे दोन मुलींसह एका मुलगा असे कुटुंब होते. पण 6 वर्षांपूर्वी काळाने घाला घातला आणि धाकट्या मुलगा सारंग कदम याचा अवघ्या 18 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.  मुलाच्या मृत्यूनंतर कदम कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर थोरल्या मुलीचा विवाह झाला. मधल्या मुलीत आई वडिलांनी खाकी वर्दीचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणींना कणखरपणे सामोरे गेले. या दिवसांमध्येही तिने कोणत्याही अकादमी शिवाय हे यश मिळवले. दिवस रात्र मेहनत घेत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून मुलींच्यात राज्यात 12 वा येण्याचा बहुमान तिने मिळवला....या यशस्वी तेजशलाकाचे नाव आहे अश्विनी शरद कदम होय. मुलाच्या अपघाती मृत्यू नंतर आई वडिलांनी तिच्यात सर्वस्व पाहून अधिकारी होण्याची जिद्द मनी बाळगली होती. खडतर प्रवासातून अखेर पीएसआय होऊन तिने आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. 

आई -वडिलांची इच्छा पूर्ण केली 

अश्विनी कदम  (रा.सांगवी,ता.बारामती ) हिने श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर, पणदरेसह बीएससी अग्रिकल्चर कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे पदवीधर शिक्षण पूर्ण केले. तिला एक मोठी विवाहित बहीण आहे. धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर अश्विनीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी पडली. अश्विनी लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिच्या वडिलांचे दहावी तर आईचे सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. परंतु तिच्यात अधिकारी होण्याची क्षमता आहे हे तिच्या आई-वडिलांनी ओळखले होते. आई -वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने पीएसआय होण्याचा सल्ला अश्विनीला दिला होता, आई वडिलांच्या मिळालेल्या पाठबळामुळेच अश्विनीला पोलीस उपनिरीक्षक होता आले. तिच्या या उत्तुंग भरारी मुळे सर्वांनी तिचे भरभरून अभिनंदन केले आहे. पीडितांना न्याय देण्यासाठी पुढे अश्विनीला उपविभागीय पोलिस अधिकारी होण्याची जिद्द असून त्या ध्येया पर्यंत लवकरच पोहचणार असल्याची प्रतिक्रिया अश्विनी कदमने लोकमतशी बोलताना दिली. 

Web Title: Brother death in an accident grief over family daughter becomes PSI after waiting for struggles in baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.